बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांना वाटते हल्ल्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2024 12:40 IST2024-12-18T12:39:08+5:302024-12-18T12:40:42+5:30
तपास पूर्ण, पोलिसांचे निलंबन; एसआयटीची माहिती

बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांना वाटते हल्ल्याची भीती
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, कर्तव्यात कसूर केल्याबद्दल एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली. लैंगिक अत्याचार प्रकरणात दोन आरोपपत्रे दखल करण्यात आली आहेत. त्यापैकी एक आरोपपत्र मृत आरोपी अक्षय शिंदे आणि दुसरे आरोपपत्र शाळेच्या विश्वस्तांविरोधात असल्याची माहिती एसआयटीतर्फे अॅड. हितेन वेणेगावकर यांनी न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाला दिली.
लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास आणि तपासाच्या विलंबाबद्दल बदलापूर पोलिस ठाण्यातील पोलिसांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली. 'पोलिस ठाण्यातील वरिष्ठ महिला पोलिस निरीक्षकाचे निलंबन करण्यात आले आणि त्यांच्या दोन बढत्या थांबविल्या आहेत. तसेच दोन हवालदारांनाही तंबी देण्यात आली आहे,' अशी माहिती वेणेगावकर यांनी न्यायालयाला दिली. तपास पूर्ण झाला असून, एसआयटी बरखास्त करण्यात आली आहे, असे वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी १९ डिसेंबर रोजी ठेवली.
दोन शाळकरी मुलींवर शाळेच्या टॉयलेटमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्याचे पडसाद ठाणे जिल्ह्यात उमटले होते. बदलापूर रेल्वे स्थानकावर 'रेल रोको' आंदोलनही करण्यात आले, तर आरोपीचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला.
आरोपीच्या कुटुंबीयांना वाटते हल्ल्याची भीती
शिंदेंच्या कुटुंबाने पोलिस संरक्षण नाकारले असले तरी त्यांना घरावर हल्ला होण्याची भीती वाटते. त्यामुळे त्यांच्या घराबाहेर पोलिस संरक्षण तैनात केले आहे, असे वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले, तर शिंदे कुटुंबीयांचे वकील अमित कटारनवरे यांनी शिंदे कुटुंबीयांनी पोलिस संरक्षण नाकारले नसल्याची माहिती न्यायालयाला दिली. न्यायालयाने गुरुवारी शिंदे कुटुंबीयांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले.