Join us  

"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 6:15 PM

"विरोधक कुठल्या थराला गेले आहेत?", असाही सवाल शेलारांनी उपस्थित केला

मुंबई: काल अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला पण एनकाऊंटर विरोधकांचा झाला आहे. कालपासून त्यांची व पिलावळांची वक्तव्य पाहतोय. हा बेशरमपणा आहे. अफजल गुरुची बरसी करता, तशी आता अक्षय शिंदेची पण बरसी करणार का? असा थेट सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केला. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी प्रदेश कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला.

आशिष शेलार पुढे म्हणाले, "विरोधकांची काय वक्तव्य आहेत? काय सांगत आहात? काय संदेश आहे? काय अर्थ काढायचा? थोडा अभ्यास करून बोला. एवढा थयथयाट का करताय? काय सांगायचे आहे तुम्हाला? पोलिसांनी गोळ्या खायच्या काय? त्या पिडित मुलीची मानसिकता तरी समजून घ्या. त्यांनी दिलेल्या पुराव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात? त्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचारबाबत काय? या सर्व गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे आहे काय? विरोधक कुठल्या थराला गेले आहेत?"

तुम्ही याचे राजकारण करता की तो अक्षय शिंदे, गुन्हेगार, लिंगपिसासू, त्याची माळ हे जपत आहेत? असा थेट सवाल करत तो लिंगपिपासू आणि हे सत्तापिसासू अशा शब्दांत शेलार यांनी हल्लाबोल केला. शरद पवार साहेब तुम्ही काय बोलत आहात? हलगर्जीपणा? आरोपीने पोलिसांवर हात टाकल्यावर काय त्यांनी भजन करायचे का? पोलिसांच्या बंदुकीचा जो हात घालेल, त्याला ठोकयलाच पाहिजे. आम्ही पूर्णपणे पोलिसांच्या पाठीशी आहोत. उबाठा गट आता ज्या अधिकाऱ्यांनी आरोपीला ठोकले, त्या अधिकाऱ्याला आता काय जोडे मारो करणार काय?" असा खोचक सवालही त्यांनी केला.

"महाविकास आघाडीला सवयच लागली आहे, आतंकवादी, गुन्हेगार असेल त्याला ठोकला की त्याचे फोटो घ्यायचे व गळा काढायचा. अफझल गुरुची बरसी केलीत, उद्या अक्षय शिंदेची बरसी करतील. त्या लिंगपिसासू विरोधात बोलताना का जीभ अडकत आहे? आदित्य ठाकरे आज ट्विट करीत आहेत. मग त्यांच्याकडे माहिती होती तर ते पोलिसांत का गेले नाहीत? त्यांनी हे कर्तव्य का नाही केले? नागरिक म्हणून चिमुकलीला न्याय मिळावा म्हणून ते पोलिसांकडे का गेले नाहीत?" असा सवाल शेलारांनी केला.

टॅग्स :आशीष शेलारबदलापूरमृत्यूगुन्हेगारी