Join us  

बदलापूर अत्याचार प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून दखल; उद्या सुनावणी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 12:02 AM

Badlapur Case : बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवरील अत्याचारानंतर कारवाईची मागणी झाली. यासाठी काल दिवसभर आंदोलन करण्यात आलं.

Badlapur Case ( Marathi News ) :  बदलापूर शहरातील एका प्रसिद्ध शाळेत चार वर्षीय दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर आता बदलापूरसह राज्यातील जनतेतून संतापाची लाट पसरली. आरोपीला कठोर शिक्षेची मागणी होत आहे. बदलापूर येथे संतप्त नागरिकांनी रेल्वेगाड्या रोखत आंदोलन केले. काल दिवसभर बदलापूरातील रेल्वेसेवा ठप्प होती. दरम्यान, आता या प्रकरणाची मुंबई हायकोर्टाने दखल घेतली आहे. सुमोटो याचिका दाखल करण्यात आली असून या प्रकरणी उद्या सकाळी म्हणजेच २२ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. 

बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेची चौकशी मुंबई हायकोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटीकडून करण्याची मागणी करण्यात आली आहे. न्यायमूर्ती भारती डोंगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. 

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आज न्यायालयालयात हजर केले होते, यावेळी न्यायालयाने अक्षय शिंदे या आरोपीला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आरती सिंह यांच्याकडे एसआयटीची जबाबदारी दिली आहे. 

बदलापूर रेल्वेस्थानकात आंदोलन

बदलापूरातील आंदोलनाला मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली. सुमारे तासभर आंदोलनकर्त्यांसोबत त्यांनी चर्चा केली. पण, आंदोलनकर्ते त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, या आंदोलनात अनेकजण माझी लाडकी बहीण योजनेचे बोर्ड घेऊन थांबले आहेत. हे कोणती लोक आहेत, असा सवालही महाजन यांनी केला. गृहमंत्री फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली आहे. ज्यांनी कारवाईला विलंब केला त्यांना निलंबित केले आहे. या आंदोलनात कोणाची लीडरशीप नाही, ते तरुण आहेत. त्यांचा राग योग्य आहे पण, अशी रेल्वेलाईन अडवणे चुकीचे आहे. आरोपीला लवकरात लवकर आपण शिक्षा देणार आहोत, असंही मंत्री गिरीश महाजन म्हणाले. 

टॅग्स :न्यायालयबदलापूर