लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणात तातडीने गुन्हा नोंदवून तपास करण्यात दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई केली, अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे बुधवारी केली.
कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांची चौकशी करण्यासाठी खातेनिहाय चौकशी करण्यात आल्याची नोंद न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज देशमुख यांच्या खंडपीठाने घेतली. कर्तव्यात हलगर्जी केल्याचा ठपका एका पोलिस अधिकाऱ्यावर ठेवण्यात आला आहे. खातेनिहाय चौकशीचा अहवाल पोलिस आयुक्तांकडे पाठविला आहे, अशी माहिती महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी उच्च न्यायालयाला दिली.
पुढच्या वेळी सांगा..
पुढील सुनावणीस बदलापूर पोलिस ठाण्यातील कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई केली, याची माहिती आम्हाला द्या, असे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले. दोन्ही पीडितांना सरकारच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत नुकसानभरपाई देण्यात आली, अशी माहिती सराफ यांनी न्यायालयाला दिली. न्यायालयाने पुढील सुनावणी सहा आठवड्यांनी ठेवली.