Join us

"बदलापूर प्रकरणात कायद्याने चालावं लागणार, खटला फास्टट्रॅक कोर्टात वकील उज्ज्वल निकम चालवणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 5:52 PM

Girish Mahajan : बदलापूरमध्ये चार वर्षीय दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली असून या घटनेवरुन आंदोलन सुरू आहे.

Girish Mahajan ( Marathi News ) : बदलापूर शहरातील एका प्रसिद्ध शाळेत चार वर्षीय दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर आता बदलापूरसह राज्यातील जनतेतून संतापाची लाट पसरली आहे. आरोपीला कठोर शिक्षेची मागणी होत आहे. बदलापूर येथे संतप्त नागरिकांनी रेल्वेगाड्या रोखत आंदोलन केले. आज सकाळपासून बदलापूरातील रेल्वेसेवा ठप्प आहे. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. दरम्यान, आता मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली असून त्यांच्यासोबत चर्चा केली. यानंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.  यावेळी महाजन म्हणाले की, ज्या अधिकाऱ्यांनी कारवाईला उशीर केला त्यांना निलंबित केले आहे. आपल्याला कायद्याने चालावे लागणार आहे', असंही महाजन म्हणाले. 

'प्रशासनावर विश्वास नाही, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे';बदलापूर प्रकरणावरुन खासदार प्रणिती शिंदे संतापल्या

बदलापूरातील आंदोलनाला मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली. सुमारे तासभर आंदोलनकर्त्यांसोबत त्यांनी चर्चा केली. पण, आंदोलनकर्ते त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, या आंदोलनात अनेकजण माझी लाडकी बहीण योजनेचे बोर्ड घेऊन थांबले आहेत. हे कोणती लोक आहेत, असा सवालही महाजन यांनी केला. गृहमंत्री फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली आहे. ज्यांनी कारवाईला विलंब केला त्यांना निलंबित केले आहे. या आंदोलनात कोणाची लीडरशीप नाही, ते तरुण आहेत. त्यांचा राग योग्य आहे पण, अशी रेल्वेलाईन अडवणे चुकीचे आहे. आरोपीला लवकरात लवकर आपण शिक्षा देणार आहोत, असंही मंत्री गिरीश महाजन म्हणाले. 

"या आंदोलनात सहभागी असलेले लोक वेगवेगळ्या गावचे आहे, कोणाला समजवायचं, कोणही यात लीडरशीप करत नाही. त्यामुळे कोणाशी बोलायचं? आंदोलनकर्ते म्हणत आहेत की आताच्या आता आरोपीला फाशी द्या, पण कायद्यात असं कुठेही नाही. आपल्याला कायद्याने चालावे लागणार आहे, सीसीटीव्ही डिलिट केले आहेत. हे प्रकरण फास्टट्रॅकमध्ये टाकण्यात आले आहे, असंही मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. 

बदलापूर अत्याचार प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकम यांच्याकडे देणार

या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार आहे. हा खटला वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्यात येणार आहे. लवकरात लवकर आरोपीला आम्ही शिक्षा देणार आहोत, असंही महाजन म्हणाले. 'लाडकी बहीण योजेनेचे बोर्ड दाखवण्यात आलेत'

या आंदोलनात काही आंदोलनकर्त्यांच्या हातात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे बोर्ड आहेत. या प्रकरणाचा राजकीय फायदा कोणीही घेऊ नये. हे बोर्ड रात्रीच छापल्याचं दिसतं आहे, असा आरोपही मंत्री गिरीष महाजन यांनी केला. 

टॅग्स :गिरीश महाजनपोलिसभाजपादेवेंद्र फडणवीसउज्ज्वल निकम