आरोपी अक्षय शिंदेला पुन्हा पोलिस कोठडी, अत्याचाराची सखोल चौकशी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 08:02 AM2024-09-04T08:02:04+5:302024-09-04T08:03:15+5:30
Badlapur Case Update: बदलापूरमधील बालिका अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला मंगळवारी पुन्हा कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
कल्याण - बदलापूरमधील बालिका अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला मंगळवारी पुन्हा कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
आरोपी शिंदेचा मोबाइल अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तसेच त्याने आणखी किती मुलींचे लैंगिक शोषण केले हेही चौकशीत उघड झालेले नाही. त्यामुळे सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिंदेला पोलिस कोठडी देण्याची मागणी मागील सुनावणीच्या वेळी सरकारी वकिलांनी केली होती. त्यानुसार सरकारी वकील अश्विनी भामरे-पाटील यांनी आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती न्यायालयाला मंगळवारी केली असता न्यायालयाने शिंदेला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
शिंदेला अटक करून पोक्सोच्या विशेष न्यायालयासमोर हजर केले होते. तेव्हा त्याला २६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडी दिल्याने त्याची रवानगी आधारवाडी कारागृहात झाली होती. गेल्यावेळी त्याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत वाढवली होती.
आरोपीचा मोबाइल अद्याप बेपत्ता...
आरोपी शिंदेचा मोबाइल पोलिसांना अजून सापडलेला नाही. त्याने आणखी किती मुलींचे लैंगिक शोषण केले, हेही उघड झालेले नाही. या दोन्ही मुद्द्यांच्या अनुषंगाने त्याच्या सखोल चौकशीसाठी सरकारी वकिलांनी पाच दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.