Join us  

Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 9:57 AM

Akshay Shinde Shot Dead : बदलापूर येथील नामांकित शाळेतील दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला सोमवारी सायंकाळी पोलीस चकमकीत ठार करण्यात आले.

Akshay Shinde Shot Dead : बदलापूर येथील नामांकित शाळेतील दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला सोमवारी सायंकाळी पोलीस चकमकीत ठार करण्यात आले. मुंब्रा बाह्यवळण मार्गाजवळ पोलीस वाहनातच झालेल्या गोळीबाराच्या या घटनेत सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे जखमी झाले.या प्रकरणी आता राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एन्काउंटर प्रकरणी प्रश्न उपस्थित केले आहेत. 

अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट

खासदार संजय राऊत यांनी आज टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी एन्काऊंटर प्रकरणी प्रश्न उपस्थित केले. राऊत म्हणाले, हा प्रकार संशयास्पद आहे. एखाद्या गुन्हेगाराचा एन्काउंटर होणे यात हळहळण्यासारखे काही नाही. पण, हा एन्काऊंटर मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी झाला आहे. ज्या संस्थेमध्ये दोन मुलींवर अत्याचार झाले, त्या शाळेत तो शौचायल साफ करत होता.सफाई काम करणारा मुलगा पोलिसांच्या कमरेवरील बंदुक हिसकवणार? ती बंदुक बंद असते, ती लॉक असते. हे कोणाला पटेल का?, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला. 

"पोलिसांना किंवा सरकार,देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना आपटे, कोतवाल, आठवले यांना वाचवायचं आहे. त्यासाठी त्यांनी मुख्य पुरावा नष्ट केला. आता प्रश्न असा आहे की हजारो लोकांनी बदलापूरात रस्त्यावर उतरुन आरोपीला फाशी द्या ,आमच्या ताब्यात असं सांगत होती. तेव्हा दुसऱ्या दिवशी फडणवीस म्हणाले कायदा हातात घेऊ देणार नाही. मग दुसऱ्याच दिवशी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करुन अटक का केली? ते गुन्हे आधी मागे घ्या आणि ज्यांवर पोक्सो कायद्याने गुन्हे दाखल आहेत, त्यांना अजून अटक का केली नाही? असा सवालही खासदार राऊत यांनी केला. 

राऊतांचे आरोप

"शाळेतील सीसीटीव्ही फुटेज का काढून टाकले? नेमके त्या काळातीलच का काढले. संस्थाचालकांनी काढले आहेत. संस्थाचालक हे भारतीय जनता पक्षाशी संबंधीत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या संबंधीत आहेत. त्यांना वाचवण्यासाठी कालचे कथानक रचले होते, असा आरोपही खासदार संजय राऊत यांनी केला.  

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अन्य आरोपींना वाचवायचे आहे, त्यासाठी दिवसाढवळ्या केलेला कालचा खून आहे. बलात्काऱ्यांना अशा प्रकारच्या शिक्षा व्हायला पाहिजेत. या विषयी आमचे दुमत नाही, पण कोणाला तरी वाचवण्यासाठी हा बनाव आणि हे कथानक रचले आहे, असंही राऊत म्हणाले. महाराष्ट्रातील सध्याचे वातावरण आहे, मनोज जरांगे पाटील यांचे आरक्षणासाठी आंदोनल सुरू आहे, त्याच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी हे केले असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला. 

टॅग्स :बदलापूरपोलिस