Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 04:25 PM2024-10-01T16:25:38+5:302024-10-01T16:33:03+5:30
Badlapur Sexual Assault Case:बदलापूर केस प्रकरणातील शाळेच्या ट्रस्टींवर अजूनही अटकेची तलवार कायम आहे. याबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
Badlapur Sexual Assault Case: बदलापूर येथील दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला. तर दुसरीकडे चिमुकलींचा अत्याचार झालेल्या संबंधित शाळेच्या संस्था चालकांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याबाबत आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना आता मुंबई हायकोर्टाने झटका दिला आहे. ट्रस्टींचा कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला आहे.
“गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला १५०० रुपये मिळाले असते का?”: शहाजीबापू पाटील
बदलापूर येथे ऑगस्ट महिन्यात एका शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार झाला होता, ज्या शाळेत हा किळसवाणा प्रकार घडला, त्या शाळेचे अध्यक्ष आणि विश्वस्तांनी याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी आज १ ऑक्टोबरला सुनावणी झाली.
बदलापूर घटनेनंतर पोलिसांनी संस्था चालकांविरोधातदेखील पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र पोलीस अद्याप ट्रस्टींना अटक केलेली नाही. ट्रस्टींची अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू आहे.
अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले प्रश्न
बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत स्यु मोटो याचिका दाखल करून घेतली, त्यांच्यावरदेखील सुनावणी सुरू आहे.
अक्षय शिंदेच्या डोक्यातच का गोळी मारण्यात आली. पोलीस गोळी डोक्यात मारतात की पायावर असे सवाल न्यायालयाने विचारले. तीन गोळ्या झाडल्या तर उरलेल्या दोन कुठे गेल्या? चार पोलीस एका व्यक्तीला नियंत्रित करू शकत नव्हते का? असा सवाल करत ज्या पोलिसाला गोळी लागली त्याचा लागलेली गोळी आरपार गेली की घासून गेली, असाही सवाल न्यायाधीशांनी केला. न्यायाधीशांनी पोलिसांना अक्षयने खेचले ते पिस्तुल होते की रिव्हॉल्व्हर होते, असा पहिला सवाल केला. यावर सरकारी वकिलांनी ते पिस्तूल होते असे सांगताच न्यायाधीशांनी दुसरा प्रश्न केला.