मुंबई : लोकमतच्या वृत्तानंतर सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आपल्या मंत्री कार्यालयात साफसफाई सुरूच ठेवली असून मंगळवारी आणखी दोन पीएची त्यांनी हकालपट्टी केली.या आधी त्यांनी एक लेखाधिकारी व २ आॅपरेटरना मूळ विभागात परत पाठविले होते. आज त्यांनी त्यांचे विश्वासू मानले जाणारे रवींद्र माने यांना खासगी सचिव पदावरून हटवावे, असे पत्र सामान्य प्रशासन विभागाला दिले. माने हे बडोले यांच्या मलबार हिल वरील बंगल्यातच राहत होते. त्यांना बंगला सोडून जाण्यास सांगण्यात आले. दुसरे शासकीय पीए असलेले प्रवीण शेटे यांना बडोलेंनी आज मूळ विभागात पाठविले. गेल्या शुक्रवारी बडोले यांच्या मंत्री दालनात शिक्षण संस्थाचालक अरुण निटुरे यांनी बडोलेंच्या मंत्री कार्यालयात एका लेखाधिकाऱ्याला मारहाण केली होती. हा अधिकारी पैसे घेऊनही काम करत नाही असे निटुरेंचे म्हणणे होते. लोकमतने हे वृत्त दिल्यानंतर खळबळ माजली होती. ज्यांच्याबाबत तक्रारी आहेत असे डॉ. सोनवणे व रवींद्र माने यांच्याबाबत बडोले काय निर्णय घेतात याबाबत उत्सुकता असल्याचे वृत्त लोकमतने मंगळवारी दिले होते. त्यातील माने यांना आज हाकलले. बडोले यांच्या मंत्री आस्थापनेवरच ज्यांची नियुक्ती नियमबाह्य आहे, असे डॉ. सोनवणे अद्याप पीए पदावर कायम आहेत. त्या व्यक्तिरिक्त बहुतेक सफाई बडोले यांनी पूर्ण केली आहे.
बडोलेंनी आणखी २ पीएना हाकलले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 2:44 AM