मुंबई : राज्य सरकारने एसटी संपात सहभागी झालेल्या कर्मचा-यांवर बडतर्फची कारवाई केली आहे. त्या 1010 कर्मचा-यांना पुन्हा एकदा संधी देऊन त्यांना नोकरीवर रुजू करून घ्यावे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला केले आहे.
गेल्या 8 जूनच्या दरम्यान एसटी कर्मचा-यांनी वेतनवाढीसाठी अघोषित संप पुकारला होता. या संपामुळे राज्य सरकारचे मोठे नुकसान झाले होते. या संपामुळे सामान्य जनतेचे हाल झाले होते, तसेच कर्मचा-यांनी केलेल्या हिंसाचारामुळे जाळपोळ आणि तोडफोड करून अनेक गाड्यांचे नुकसान केले. या हिंसाचारात नव्याने रुजू झालेले अनेक कर्मचा-यांचा समावेश होता. या कर्माचा-यांवर राज्य सरकारने बडतर्फीची कारवाई केली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
दरम्यान, राज्य सरकारने बडतर्फ केलेल्या कर्मचा-यांच्या नातेवाईकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा केली आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून हे प्रकरण हाताळावे असे सांगितले. हे एसटी कर्मचारी चुकले आहेत, मात्र ते आपल्याच परिवारातील आहेत. त्यांना एक संधी द्यायला हवी, असेही उद्धव ठाकरे यांनी दिवाकर रावते यांना सांगितले.