मुंबई : घाटकोपर इमारत दुर्घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटल्याने मुंबई महापालिकेला अखेर जाग आली आहे. त्यामुळे या इमारतीच्या तळमजल्यावर नर्सिंग होममध्ये बेकायदा बदल करून पिलर तोडणारा सुनील शितप आता पालिकेच्या रडारवर आहे. १७ निष्पाप रहिवाशांचा नाहक बळी गेल्यानंतर शितप याचे बेकायदा बांधकाम हुडकून काढण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार अंधेरी- घाटकोपर जोड रस्त्यावरील त्याचे बेकायदा व्यावसायिक गाळे शुक्रवारी तत्काळ जमीनदोस्त करण्यात आले आहेत. मात्र हे बांधकाम शितपचेच असल्याबाबत पालिकेने मौन बाळगले आहे.घाटकोपर पश्चिम येथील सिद्धिसाई इमारत मंगळवारी कोसळून त्यात १७ रहिवाशांचा बळी गेला. सुनील शितप या स्थानिक नेत्याच्या या इमारतीमध्ये तीन सदनिका होत्या. त्यातील एका सदनिकेत नर्सिंग होम चालविले जात होते. या नर्सिंग होमचे बेकायदा नूतनीकरण गेले दोन महिने सुरू होते. मात्र या काळात त्या जागेची पाहणी करूनही पालिकेला हे बेकायदा नूतनीकरण दिसले नाही. या नूतनीकरणाच्या वेळी पिलर काढल्यामुळे धोकादायक बनलेली ही इमारत कोसळली. या दुर्घटनेचा तीव्र संताप सर्वत्र व्यक्त होत आहे.शिवसेनेनेही जबाबदारी झटकल्यामुळे शितपच्या बेकायदा बाधकामांचा शोध सुरू झाला आहे. अशाच प्रकारे अल्ताफ नगरमध्ये खासगी जागेवर सुरू असलेल्यादोन बेकायदा व्यवसायिक गाळ्यांवर पालिकेने शुक्रवारी कारवाईकेली. २०१०मध्ये कारवाई करून हे अतिक्रमण पाडण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले होते.परवानगी नव्हती...२००९ मध्ये ‘वापरात बदल’साठी अर्ज करीत शितपने परवाना मिळवला होता. मात्र या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले नव्हते. पालिका अधिनियम ३१४ अंतर्गत बांधकामात कोणतेही मोठे बदल करण्यापूर्वी स्थानिक विभाग कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.ही इमारत १९८३मधील असल्याने पालिकेने या इमारतीच्या बांधकामाचा काही तुकडा तपासणीसाठी पाठविला आहे. त्यावरूनच या इमारतीची खरी परिस्थिती कळणार आहे.पिलर तोडल्याचे उघडइमारतीचा भार पेलणारे बीम आणि कॉलम नर्सिंग होमच्या नूतनीकरणावेळी तोडण्यात आल्याचे या दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. येथील जागा वाचविण्यासाठी हे खांब तोडून मेटलचे पाईप टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. या इमारतीवरील पाण्याच्या टाकीचा भार असलेल्या उजव्या बाजूचाच बीम तोडण्यात आल्याने ही इमारत कोसळल्याचे प्राथमिक चौकशीत दिसत असल्याचे सूत्रांकडून समजते.या इमारतीमध्ये सुरू असलेल्या नूतनीकरणाची रहिवाशांनी पालिकेकडे तक्रार केली होती. मात्र दुरुस्तीसाठीची परवानगी पालिकेकडून मिळाली असल्याचे शितप याने सांगितले होते, असे रहिवासी सांगत आहेत. त्याच्या अर्जानुसार या नर्सिंग होमचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली होती.त्याप्रमाणे दुर्घटनेच्या अवघ्या चार दिवसांआधी पालिकेच्या पथकाने या नर्सिंग होमची पाहणी केली होती. मात्र इमारतीचे नूतनीकरण सुरू असल्याचे या अहवालात नमूद नाही.चौकशीचे आदेशया दुर्घटनेस जबाबदार कोण याचा शोध घेण्यासाठी आयुक्त अजय मेहता यांनी द्विसदस्यीय समिती नेमली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सनदी अधिकारी वर्गाची चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेमार्फत सुरू असलेल्या चौकशीचा अहवाल १५ दिवसांमध्ये येणार आहे.
बेकायदा बांधकाम शितपचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 2:49 AM