Join us

प्रवेश फी असलेली बॅग सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 4:43 AM

लोकलमध्ये हरविलेली विद्यार्थ्यांची प्रवेश फी असलेली बॅग रेल्वे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे प्रवाशाला परत करण्यात आली.

मुंबई - लोकलमध्ये हरविलेली विद्यार्थ्यांची प्रवेश फी असलेली बॅग रेल्वे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे प्रवाशाला परत करण्यात आली. वडाळा रेल्वे स्थानकातील पोलीस नाईक एस.एस. पोळ यांच्या सतर्कतेमुळे तब्बल १ लाख ३८ हजार रोख रक्कम आणि प्रवेशाची कागदपत्रे असलेली बॅग सदर प्रवाशाला परत करण्यात आली. यामुळे प्रवाशांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले असून त्यांच्या कर्तव्यदक्षतेला ‘सॅल्यूट’ केले.सोमवारी ११ जून रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास हार्बर मार्गावरील पनवेल लोकलमध्ये बेवारस बॅग असल्याचा कॉल रेल्वे हेल्पलाइनला आला. यानुसार कर्तव्यावर असलेल्या पोलीस नाईक /३२५४ एस.एस. पोळ यांनी सदर लोकल अटेंड केली. बॅग पोळ यांनी वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात आणली. बॅगेमधील मोबाइलवरून संपर्क केल्यानंतर ती काळाचौकीतील बाळकृष्ण महाडिक यांची असल्याचे स्पष्ट झाले.रेल्वे पोलिसांच्या फोननंतर महाडिक वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात आले. बॅगेत १ लाख ३८ हजार ८०० रुपये रोख रक्कम आणि विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठीची कागदपत्रे मिळाल्याने त्यांनी पोलीस पोळ आणि वडाळा रेल्वे पोलिसांचे आभार मानले.

टॅग्स :पोलिसमुंबई