Dhirendra Krishna Shastri In Mumbai: गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांवरून बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री चर्चेत आहेत. यातच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा कार्यक्रम मुंबईत होत आहे. या कार्यक्रमासाठी धीरेंद्र कृष्ण शास्त्री मुंबईत दाखल झाले असून, बागेश्वर बाबांचा दरबार भरवला जाणार आहे. बागेश्वर बाबांच्या या कार्यक्रमाला काँग्रेस, मनसेसह अनेकांनी विरोध दर्शवला आहे. यातच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना एक आव्हानही देण्यात आले आहे.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा मीरा रोड येथे दरबार भरणार असल्याचे सांगितले जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जादूटोणा आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा आरोप करत बागेश्वर बाबांविरोधात मीरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच बागेश्वर बाबांनी १० लोकांची खरी खरी माहिती द्यावी. त्यांनी १० लोकांची योग्य माहिती दिल्यास त्यांना ३० लाख रुपये दिले जाईल, असे थेट आव्हान दिले आहे.
त्यांच्याकडे कोणतीही दिव्यशक्ती नसल्याचे स्पष्ट होईल
अंनिसचे श्याम मानव यांनी हे आव्हान दिले आहे. बागेश्वर बाबांनी आमचे आव्हान स्वीकारले नाही किंवा योग्य माहिती देण्यास अपयशी ठरले तर त्यांच्याकडे कोणतीही दिव्यशक्ती नसल्याचे स्पष्ट होईल, असे श्याम मानव यांनी म्हटले आहे. श्याम मानव यांनी मीरारोड पोलीस ठाण्यात तसे पत्र दिले आहे. बागेश्वर बाबा हे जादूटोणा करतात. मंत्र म्हणून आजार बरा करण्याचा दावा करतात. हा प्रकार अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा आहे. यूट्यूबवर बागेश्वर बाबांचे अनेक व्हिडिओ आहेत. त्यावरून ते अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचे स्पष्ट होते, असे श्याम मानव यांनी या पत्रात म्हटले आहे. तसेच बागेश्वर बाबांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, धीरेंद्र शास्त्री यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही विधानभवनात बागेश्वर बाबांना विरोध केला आहे. कारण या महाराजांनी तुकाराम महाराजांविरुद्ध अत्यंत चुकीचे विधान केले होते, असे श्याम मानव म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"