बहिणाबाई चौधरींच्या काव्याचा रंगमंचीय अविष्कार, नेहरू सेंटरमध्ये रंगणार 'सांगे बहीणा' अनोखा कार्यक्रम
By संजय घावरे | Published: March 13, 2024 04:20 PM2024-03-13T16:20:54+5:302024-03-13T16:21:17+5:30
ग्रामीण कवितेला एक नवी ओळख देणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान आहे.
मुंबई - ग्रामीण कवितेला एक नवी ओळख देणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. त्यांच्या कविता आणि त्यांच्या साहित्यिक प्रवासावर आधारलेल्या 'सांगे बहिणा' हा अनोखा कार्यक्रम नेहरू सेंटरमध्ये होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.
वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या वरळीतील नेहरू सेंटर २२ मार्चला संध्याकाळी ७ वाजता 'सांगे बहीणा' हा संगीत, गायनावर आधारलेला कार्यक्रम सादर केला जाणार आहे. बहिणाबाईंनी आपल्या कवितांमधून महिलांचे भावविश्व, संसाराची, परिवाराची गाथा मार्मिक शब्दांत मांडली. ग्रामीण बोली भाषेतील त्यांच्या कविता प्रेक्षकांना अधिक भावल्या. कल्याणी साळुंखे यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या या कार्यक्रमात संगीत, संगीत संयोजन आणि गायनाद्वारे बहिणाबाईंच्या कवितेचा वेगळा रंगमंचीय अविष्कार पाहायला मिळणार आहे. 'सांगे बहिणा'मध्ये अभिनेत्री मनिषा कोल्हे बहिणाबाईच्या कविता सादर करणार आहेत.
चंद्रशेखर पाचपांडे यांनी संहिता लेखन केले आहे. जगाच्या नकाशावर महाराष्ट्रासोबतच भारताचेही नाव उज्वल करणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याच्या संकल्पनेतून 'सांगे बहिणा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बहिणाबाई निरक्षर होत्या. बालविवाहामुळे बालवयातच त्यांना संसारीक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागल्या. असे असतानाही त्यांनी जे काही अनुभवले, सोसले, निसर्ग, परिसर, कुटुंब, ग्रामीण जीवनशैलीमध्ये पाहिले ते काव्यातून व्यक्त केले. त्याची नोंद कुठे होत नव्हती.
त्यांचे चिरंजीव, कुटुंबातले स्नेहमंडळी यांनी हे काव्य लिहिले. ते तमाम रसिकांना, कवींना प्रोत्साहन देणारे ठरले. त्यांच्या काव्यामुळे ग्रामीण कवितेला बहर आला. विशेष म्हणजे खान्देशी भाषेत लिहिलेल्या कविता साध्या, सोप्या असल्या तरी रंगमंचावर सादर करण्याचा फारसा प्रयत्न झाला नाही. लेवा गणबोली भाषेतल्या या कविता प्रेक्षकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीकोनातून नेहरू सेंटर 'सांगे बहिणा' सादर करणार आहे. बहिणाबाई यांच्या निवडक रचनांचे नाविन्यपूर्ण विवेचन आणि संगीतमय सादरीकरण असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका १८ मार्चपासून सभागृहाच्या आरक्षण खिडकीवर सकाळी साडे दहा वाजल्यापासून उपलब्ध करण्यात येणार आहे.