ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.४ - 'भाजपाकडून जाणीवपूर्वक बहुजन नेतृत्वाला टार्गेट केलं जात आहे' असा गंभीर आरोप काँग्रेस नेते नारायण राणेंनी केला आहे. कथित पीएचे लाचखोरी प्रकरण, मोस्ट वॉँटेड दहशतवादी दाऊदचे कॉल प्रकरण, तसेच भोसरीतील जमीन खरेदीप्रकरण अशा अनेक आरोपांच्या गर्तेत अडकलेले भाजपाचे वरिष्ठ नेते व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर आज
मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राणेंनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली असून त्यांनी खडसेंची पाठराखण केली आहे.
' एकनाथ खडसे यांच्यावरील आरोप निश्चितपणे गंभीर आहेत आणि त्यांनी यापूर्वीच राजीनामा द्यायला पाहिजे होता. मात्र, खडसे भाजपमधील आणि बहुजन समाजाचे मोठे नेते आहेत. मात्र भाजपाने खडसेंच्या अब्रूचे मुद्दाम इतके दिवस धिंडवडे काढून, त्यांना पार बदनाम करून आता राजीनामा घेतला', अशी टीका राणेंनी केली. ' खडसेंची जागा नवीन बहुजन मंत्री भरून काढून शकत नाही. तो सोयीचा असेल. भाजपात बहुजन नेत्यांवरच का आरोप होतात?' असा सवालही राणेंनी विचारला. खडसे यांच्यासारख्या नेत्याचे इतके धिंडवडे काढण्याची गरज नव्हती. त्यापेक्षा यापूर्वीच त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे होता, असे राणे म्हणाले. खडसेंचे प्रकरण फार वाईट पद्धतीने हाताळले गेले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसेंचा बळी घेतला' असा गंभीर आरोपही राणेंनी केला.
तर खडसे यांच्या केवळ राजीनाम्याने भागणार नाही तर त्यांच्यावरील सर्व आरोपांची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. खडसे यांच्या प्रमाणेच मंत्रीमंडळातील इतर भ्रष्ट मंत्र्यांवरही कारवाई करा, असेही मुंडे म्हणाले.
दरम्यान खडसेंच्या राजीनाम्यामुळे आपल्याला आनंद झालेला नाही, पण सध्याची परिस्थिती पाहता हा निर्णय आवश्यक होता, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गो-हे यांनी दिली. मात्र बहुजन समाजाला टार्गेट केले जाते हा आरोप चुकीचा आहे, असेही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नारायण राणेंचा आरोप अमान्य केला असून बहुजन नेतृत्व संपवण्याचा कोणताही डाव नाही, असे म्हटले आहे. तसेच एकनाथ खचसे यांची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणीही चव्हाण यांनी केली आहे.