‘परे’च्या प्रवाशांना आता ‘अच्छे दिन’
By admin | Published: May 15, 2017 06:34 AM2017-05-15T06:34:46+5:302017-05-15T06:34:46+5:30
स्कायवॉक, नव्या लिफ्ट, सरकते जिने, एलिव्हेटेड डेक, पादचारी पूल, बुकिंग कार्यालय, प्रवासी आरक्षण केंद्र, शौचालय या सुविधांनी पश्चिम रेल्वेची स्थानके सुसज्ज होणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्कायवॉक, नव्या लिफ्ट, सरकते जिने, एलिव्हेटेड डेक, पादचारी पूल, बुकिंग कार्यालय, प्रवासी आरक्षण केंद्र, शौचालय या सुविधांनी पश्चिम रेल्वेची स्थानके सुसज्ज होणार आहे. मंगळवारी या सेवांचे लोकार्पण होणार असून, या सेवांमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना अच्छे दिन येणार आहेत.
पश्चिम रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) वतीने मंगळवारी परेवरील बहुतांशी स्थानकांवर विविध प्रवासी सुविधांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. कार्यक्रमात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुविधांचे लोकार्पण करतील.
पश्चिम रेल्वे स्थानकांवर एमआरव्हीसीकडून प्रवासी सुविधांचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले. पश्चिम रेल्वेवरील वर्दळीचे स्थानक म्हणून बोरीवली स्थानकाचे नाव घेतले जाते. या स्थानकातून दररोज ३ ते ४ लाख प्रवासी प्रवास करतात. लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या थांब्यासाठीदेखील बोरीवली स्थानक महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने प्रवासी सुविधा उद्घाटनाचा ‘श्री गणेशा’ याच स्थानकातून होणार आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रवासी सुविधांवर भर देण्यात येईल, असे अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केले होते. त्यानंतर, उपनगरीय स्थानकांवर प्रवासी सुविधांच्या कामाचा सपाटा लावण्यात आला होता. पश्चिम रेल्वेवर सुमारे ३५ लाख प्रवासी प्रवास करतात. या पैकी ७.५ लाखांहून अधिक महिला प्रवासी आहेत. या सुविधांमुळे महिला प्रवाशांना विशेष लाभ मिळणार आहे. एकूणच सध्या प्रवासी सुविधा कामांच्या पूर्णत्वामुळे तूर्तास पश्चिम रेल्वेवरील
प्रवाशांचे ‘अच्छे दिन’ सुरू होणार आहेत.