पत्नीची हत्या करून आत्महत्येचा बनाव रचणाऱ्या पतीला जामीन; जन्मठेपेची शिक्षा हायकोर्टाकडून रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 08:33 AM2023-12-18T08:33:54+5:302023-12-18T08:34:16+5:30
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात कुंभेज गावात दत्तात्रेय नागटिळक यांचे पत्नी मनीषाशी सतत भांडण होत असे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पत्नीची हत्या करून त्यानंतर आत्महत्येचा बनाव रचणाऱ्या पतीला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा, शवविच्छेदन अहवाल आणि वैद्यकीय अहवाल यात विसंगती आढळल्याने हायकोर्टाने आरोपीची जन्मठेपेची शिक्षा रद्द करत पतीचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात कुंभेज गावात दत्तात्रेय नागटिळक यांचे पत्नी मनीषाशी सतत भांडण होत असे. भांडणाला कंटाळून २७ डिसेंबर २०१८ रोजी मनीषाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपी ५ वर्षांपासून तुरुंगात असल्याने सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिक्षेला आरोपीने उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
अहवालात विसंगती का?
न्यायालयाने सरकारी पक्षाच्या वकिलांना काही प्रश्न विचारले त्याची उत्तरे सरकारी वकिलांना देता आली नाहीत.
न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार मृत महिलेच्या दोन मुलांचे जबाब का घेतले गेले नाही? तसेच शवविच्छेदन अहवाल आणि एफ आय आर यामध्ये विसंगती असून त्याबाबत तुमचे म्हणणे काय, असे खंडपीठाने सरकारला विचारले. घटना घडली तेव्हा रक्त त्या ठिकाणी सांडल्याची माहिती पत्नीच्या भावाने दिली होती.
मात्र, शवविच्छेदन अहवालात तशी कुठलीही जखम आणि रक्त आढळल्याचे दिसत नाही, असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले.