कासा (पालघर) : डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे चोर समजून आठ महिन्यांपूर्वी दोन साधू व वाहनचालकाची जमावाने हत्या केली होती. या प्रकरणात एकूण ५४ आरोपींचा जामीन गुरुवारी न्यायालयाने मंजूर केला, तर अटक करण्यात आलेल्यांपैकी उर्वरित लोकांच्या जामीन अर्जावर ५ डिसेंबरला सुनावणी ठेवण्यात आली आहे.
गडचिंचले गावात जमावाने गैरसमजातून तिघांची हत्या केली. या प्रकरणात हत्येत सामील असल्याचे दाखवून जवळपास दोनशेहून अधिक जणांवर संशयित म्हणून कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी काही जणांची न्यायालयाने याआधी जामिनावर सुटका केली आहे. गुरुवारी संध्याकाळी पालघरचे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. पी. जाधव यांनी ५४ आरोपींची प्रत्येकी १५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका केली आहे.
आरोपींतर्फे वकील अमृत अधिकारी आणि अतुल पाटील यांनी बाजू मांडताना म्हटले की, आरोपींची सदर घटनेत कोणतीच भूमिका नव्हती. त्यांना फक्त संशयावरून अटक केली होती. मृत साधूंच्या कुटुंबीयांच्या बाजूने वकील पी. एन. ओझा यांनी बाजू मांडली.