घोसाळकर हत्येप्रकरणी बॉडीगार्डचा जामीन फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 02:46 PM2024-03-06T14:46:19+5:302024-03-06T14:47:05+5:30

पोलिसांनी अमरेंद्र मिश्रा याला शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत अटक केली. सामाजिक कार्यकर्ता व स्थानिक रहिवासी मॉरिस नोरान्हा याने घोसाळकर यांची हत्या करण्यासाठी मिश्रा याची पिस्तूल वापरली.

Bail of bodyguard rejected in Ghosalkar murder case | घोसाळकर हत्येप्रकरणी बॉडीगार्डचा जामीन फेटाळला

घोसाळकर हत्येप्रकरणी बॉडीगार्डचा जामीन फेटाळला

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यासाठी मॉरिस नोरान्हाने वापरलेल्या पिस्तूलचा परवानाधारक व बॉडी गार्ड अमरेंद्र मिश्रा याची जामिनावर सुटका करण्यास सत्र न्यायालयाने नकार दिला आहे.

पोलिसांनी अमरेंद्र मिश्रा याला शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत अटक केली. सामाजिक कार्यकर्ता व स्थानिक रहिवासी मॉरिस नोरान्हा याने घोसाळकर यांची हत्या करण्यासाठी मिश्रा याची पिस्तूल वापरली. घोसाळकर यांची हत्या केल्यानंतर मॉरिसने आत्महत्या केली. अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजेश सासणे यांनी मिश्राचा जामीन अर्ज फेटाळला.  सरकारी वकिलांनी मिश्राच्या जामिनाला विरोध केला. पिस्तुलाचा वापर करण्यासाठी नोरान्हाने मिश्राला पैसे दिले होते का? आणि संबंधित पिस्तुलाचा अन्य गुन्ह्यासाठी वापर केला का? याचा तपास पोलिस करत आहेत. तसेच नोरान्हाला पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण मिश्राने दिले का? याचाही तपास पोलिस करत असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

नोरान्हावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. बलात्काराच्या प्रकरणात तो पाच महिने कारागृहात होता. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. नोरान्हा व घोसाळकर यांच्यात वाद होते. बलात्कार प्रकरणात घोसाळकरांनी आपल्याला नाहक गोवले, असे नोरान्हाला वाटत होते, असे नोरान्हाच्या पत्नीने पोलिसांना सांगितले.

Web Title: Bail of bodyguard rejected in Ghosalkar murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.