जामिनासाठी हमीदारांऐवजी रक्कम भरण्याची परवानगी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:06 AM2021-02-25T04:06:37+5:302021-02-25T04:06:37+5:30
एल्गार परिषद : वरवरा राव यांचा उच्च न्यायालयात अर्ज लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सहा महिन्यांसाठी वैद्यकीय जामीन मंजूर ...
एल्गार परिषद : वरवरा राव यांचा उच्च न्यायालयात अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सहा महिन्यांसाठी वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आलेल्या वरवरा राव यांनी दोन हमीदारांऐवजी आपली रोख रक्कम भरून जामिनावर सुटका करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती बुधवारी उच्च न्यायालयाला केली.
एल्गार परिषद व शहरी नक्षलवादप्रकरणी आरोपी असलेले ज्येष्ठ विचारवंत व कवी वरवरा राव यांची सोमवारी उच्च न्यायालयाने वैद्यकीय जामिनावर सुटका केली. न्यायालयाने त्यांना ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यासह तेवढीच रक्कम भरणारे दोन हमीदारही उपस्थित करण्यास सांगितले.
बुधवारी राव यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील आनंद ग्रोव्हर यांनी न्या. एस.एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाला सांगितले की, हमीदार मिळविण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. विशेष न्यायालयात आता रोख रक्कम भरल्यावर राव यांची सुटका करावी व त्यानंतर दोन हमीदार सादर करतो, अशी विनंती ग्रोव्हर यांनी न्यायालयाला केली. त्यावर न्यायालयाने याबाबत एनआयएचे म्हणणे ऐकल्याशिवाय ही विनंती मान्य करणार नाही, असे स्पष्ट करत गुरुवारी या अर्जावर सुनावणी ठेवली आहे.