बलात्कार प्रकरणात मॅनेजरला जामीन, आरोपीची भूमिका रूम देण्यापुरती; सत्र न्यायालयाचे निरीक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 10:01 AM2023-10-09T10:01:51+5:302023-10-09T10:02:57+5:30
प्रत्यक्ष गुन्ह्यात त्याचा सहभाग नाही, असे स्पष्ट करत मुंबई सत्र न्यायालयाने लॉज मॅनेजरचा जामीन अर्ज मंजूर केला.
मुंबई : पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या लॉज मॅनेजरला मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. बलात्कार प्रकरणात अटक केलेल्या मॅनेजरची भूमिका जोडप्याला केवळ रूम उपलब्ध करून देण्यापुरती होती. प्रत्यक्ष गुन्ह्यात त्याचा सहभाग नाही, असे स्पष्ट करत मुंबई सत्र न्यायालयाने लॉज मॅनेजरचा जामीन अर्ज मंजूर केला.
मुंबईतील संगम लॉज आणि बोर्डिंगच्या मॅनेजरने पीडिता मुलगी अल्पवयीन असतानाही मुख्य आरोपीला लॉजमधील रूम उपलब्ध करून दिली. याप्रकरणी मुलीला लॉजमध्ये आणणाऱ्यासह मॅनेजरला पोक्सो कायद्यांतर्गत अटक केली. या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी आरोपीने मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. यावर न्यायाधीश एस. सी. जाधव यांच्यासमोर सुनावणी झाली. आपण कोणताही गुन्हा केला नाही, पोलिसांना आपण पूर्ण सहकार्य करणार असल्याचे आरोपीने न्यायालयाला सांगितले.
आरोपीला अटक झाल्यापासून आरोपी तुरुंगात असून, त्याला ताब्यात ठेवून कोणताही पुरेसा हेतू साध्य होणार नाही, असे स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदवत १५ हजारांच्या जात मुचलक्यावर आरोपीला जामीन मंजूर केला आहे.