मनीषा म्हात्रे - मुलुंडमुलुंड खंडणी प्रकरणात तक्रादारानेच दुबईतील बँकेतून घेतलेल्या अडीच लाख दिनारपैकी १ लाख ७० हजार दिनार थकवल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या प्रकरणी नवघर पोलिसांनी आपला मोर्चा आता तक्रारदाराकडेच वळविला असून अधिक तपास सुरू आहे.दुबईमधून मुंबईत स्थायिक झालेले कृष्णन मेनन या सेवानिवृत्त अभियंत्याला कर्जवसुलीच्या नावाखाली धमकावून त्याच्याजवळून १० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी मेनन यांच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी खार येथील डी.आय. मॅनेजमेंट इंटरनॅशनल कंपनी अध्यक्ष विकास अरोरासह विकास चौरसिया आणि वैशाली गोवळेकर यांना अटक केली होती. मात्र या प्रकरणी अधिक शोध घेत असता तपासाला एक वेगळेच वळण मिळाले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड पूर्वेकडील हरिओम नगरमध्ये राहणारे तक्रारदार कृष्णन मेनन हे १९८७ ते २००६ या कालावधीत दुबईमध्ये अभियंता म्हणून काम करत होते. नोकरीच्या काळात त्यांनी दुबई येथील अॅमिरेट्स बँकेतून अडीच लाख दिनार म्हणजेच भारतीय चलनानुसार २५ लाखांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर २००८ पासून मेनन कुटुंबीय मुलुंड पूर्वेकडील हरिओम नगर येथे राहण्यास आले. मात्र मुंबईत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी दुबईतील बँकेकडून घेतलेल्या कर्जापैकी एकूण १ लाख ७० हजार दिनार देणे बाकी असतानाही त्यांनी २००८ पासून बँकेला परतफेड केलीच नाही. त्यासाठी बँकेनेच मेनन यांंच्याकडून भारतीय कायद्याच्या नियमावलीचे पालन करत पैसे वसूल करण्याचे प्राधिकृत पत्र दिले होते, असे तपासात समोर आले. मात्र तक्रारदार मेनन यांनी आपण कर्जाची परतफेड करून मुंबईत आल्याचा खोटा आव आणल्याचा संशय आता पोलिसांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे याबाबत अधिक तपास सुरू असून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामदास मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मात्र आरोपींनी भारतीय कायद्याचे पालन न करता चुकीच्या पद्धतीने पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही मोरे यांनी सांगितले. च्तक्रारदार कृष्णन मेनन हे १९८७ ते २००६ या कालावधीत दुबईमध्ये अभियंता म्हणून काम करत होते. नोकरीच्या काळात त्यांनी दुबई येथील अॅमिरेट्स बँकेतून अडीच लाख दिनार म्हणजेच भारतीय चलनानुसार २५ लाखांचे कर्ज घेतले होते. च्त्यानंतर २००८ पासून मेनन कुटुंबीय मुलुंड पूर्वेकडील हरिओम नगर येथे राहण्यास आले. मात्र मुंबईत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी दुबईतील बँकेकडून घेतलेल्या कर्जापैकी एकूण १ लाख ७० हजार दिनार देणे बाकी असतानाही त्यांनी २००८ पासून बँकेला परतफेड केलीच नाही.
फिर्यादीच थकबाकीदार
By admin | Published: January 02, 2015 12:29 AM