उघड्यावर मटण, मासे विकण्यावर बंदी?
By admin | Published: May 12, 2017 01:45 AM2017-05-12T01:45:13+5:302017-05-12T01:45:13+5:30
शहरात धार्मिक स्थळांसह शाळा, दवाखाने, चौक आदी ठिकाणी विनापरवाना उघड्यावर मटण, मासे, चिकनविक्री बंद होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहरात धार्मिक स्थळांसह शाळा, दवाखाने, चौक आदी ठिकाणी विनापरवाना उघड्यावर मटण, मासे, चिकनविक्री बंद होणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव महासभेत आला असून विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
उल्हासनगरमध्ये नियमांचे उल्लंघन करून मटण, मासे, चिकनविक्री होते. तसेच तपासणीविना प्राण्यांची उघड्यावर कत्तल होते. पालिकेने याविरोधात कुठलीही कारवाई केली नसून विक्रेत्यांना सुविधाही दिल्या नाहीत. सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी, मीना सोंडे यांनी महासभेत धार्मिक स्थळाजवळ तसेच शाळा, महाविद्यालये, रुग्णालये व गर्दीच्या चौकांत उघड्यावर होत असलेल्या मटण, मासे व चिकनविक्रेत्यांवर बंदीचा प्रस्ताव आणला आहे.
शिवसेनेसह इतर विरोधी पक्ष नगरसेवक उघड्यावरील मटणविक्रेत्या दुकानांना विरोध करणार असल्याची प्रतिक्रिया पीआरपीचे नगरसेवक प्रमोद टाले यांनी दिली. हा विषय महासभेत गाजणार आहे.