मुंबई - कोरोना महामारीचं संकट जगावर आलंय, पण दुसऱ्या लाटेत भारतीतील कोरोनाची परिस्थिती विदारक असल्याचं दिसून येतय. त्यातच, महाराष्ट्रातील रुग्णसंख्या सर्वाधिक असून शासन, प्रशासन आणि नागरिक या लढाईविरुद्ध एकटवटले आहेत. शर्थीचे प्रयत्न आणि प्रार्थनेतून कोरोनाला हद्दपार करण्याची मोहीम सुरू आहे. त्यातच, आज हनुमान जंयती असल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बंजरंगबलीकडे प्रार्थना केली आहे.
राज्यात गेल्या दोन महिन्यापासून दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. दररोज किमान ६० हजारांच्या आसपास नविन रुग्णांची नोंद होत आहे. आठवडाभरापूर्वी १८ एप्रिलला आतापर्यंतची सर्वाधिक ६८ हजार ६३१ इतके रुग्ण एकाच दिवशी आढळून आले होते. आठवडाभरानंतर मात्र रुग्णसंख्येत जास्तीची वाढ झालेली आढळून आली नाही. मात्र दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर आहे. त्याप्रमाणात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, ही दिलासा देणारी बाब ठरली आहे.
"कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा दिवसात राज्यभरात ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्ण कोरोनावर मात केली आहे. गेल्या चोवीस तासांत ७१ हजार ७३६ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं असून त्यात सर्वाधिक १३ हजार ६७४ रुग्ण पुणे येथील आहेत," अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली. कोरोनाच्या लढाईत गेल्या वर्षभरापासून राजेश टोपे आपलं कर्तव्य बजावत आहेत. बैठका, दौरे, पत्रकार परिषदा आणि लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आपल्यापरीने, सरकारच्यावतीने ते नागरिकांच्या हितासाठी आणि कोरोनाला हद्दपार करण्यासाठी झटत आहेत.
शर्थीच्या प्रयत्नासोबतच आज हनुमान जयंतीदिनी बजरंगबलीकडे त्यांनी प्रार्थना केली आहे. शक्तीची देवता म्हणून पवनपुत्र हनुमान यांची उपासना केली जाते. त्यामुळेच, राजेशे टोपे यांनी ट्विट करुन कोरोनाविरुद्धची लढाई लढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांना शक्ती दे... अशी प्रार्थना बजरंगबलीकडे केली आहे. टोपे यांनी लक्ष्मणाचा जीव वाचविण्यासाठी संजीवनी घेऊन येणाऱ्या मारुतीरायाचा फोटो शेअर केला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईतही मारुतीरायाप्रमाणेच अनेकजण संजीवनी घेऊन रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी धडपडत आहेत.