मुंबई, दि. 29- मुंबईमध्ये एका बकरीमुळे झालेल्या जुन्या वादामुळे काही जणांचं अपहरण करून त्यांना लुटल्याचा प्रकार घडला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार 8 जून रोजी स्वतःला गुन्हे विभागाचे अधिकारी सांगत तीन जणांनी कुलाबामधील सेशन्स कोर्टाजवळून तीघांचं अपहरण केलं. तसंच त्यांना घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. या तीघांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात असताना त्या बनावट पोलिसांनी त्यांना मारहाण केली तसंच त्यांच्याकडून एक लाख रूपये लुटले. त्यानंतर आरोपींनी त्या तीन पीडितांना अट्टल गुन्हेगार सांगत घाटकोपर पोलिसांच्या हवाली केलं. या सगळ्याचा तपास करत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एकाला अटक केल्यावर घडलेला सगळा प्रकार उघड झाला आहे. कैफ अली बहादूर खान असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.
घाटकोपरमधील गौसिया नगरमध्ये राहाणारे हारूण खान यांचं शेजारी राहणाऱ्या ओबेदुल्ला मलिक यांच्याशी बकरीवरून काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. वाद वाढल्यानंतर त्या दोघांमध्ये हाणामारी झाली. या दोघांनी एकमेकांच्या विरोधात एफआयआर दाखल केली होती. आपल्यावरील केसमधून सुटण्यासाठी हारूणचे वडील कमालुद्दीन, भाऊ मिराज आणि नातेवाईक शेर मोहम्मद कुलाबाच्या सेशन्स कोर्टात गेले होते. पीडितांनी दिलेल्या माहितीनुसार,कोर्टाच्या गेटजवळ तीन जण उभे होते. स्वतःला गुन्हे विभागाचे अधिकारी सांगत त्यांनी आमची विचारपूस करायला सुरूवात केली. थोड्यावेळानंतर त्यांनी त्यांच्या कारमध्ये आम्हाला बसवून घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये आणलं. पोलीस स्टेशनमध्ये येतान रस्त्यात त्यांनी आम्हाला मारहाण केली तसंच बेलसाठी ठेवलेले 1 लाख रूपयेसुद्धा लुटले.पोलीस स्टेशनला आल्यावर आम्हाला अट्टल गुन्हेगार सांगत पोलिसांच्या हवाली केलं.
पोलिसांनी सुरूवातीला पीडित तीन जणांना ताब्यात घेतलं. पण त्यानंतर घटनेची चौकशी करताना खरा मुद्दा पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्या तीन जणांना सोडून दिलं. ज्या कारमधून तीन पीडितांना पोलीस स्टेशनमध्ये आणलं होतं त्या कारच्या नंबर प्लेटच्या आधारावर पोलिसांनी संपूर्ण घटनेचा खुलासा केला आहे. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू झाला असून बाकी आरोपींना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.