मुंबई : भंगारातील लाकूड, कोळसा जाळून चालणाऱ्या बेकऱ्यांमुळे मुंबईतील प्रदूषणात भर पडत असून या बेकऱ्या बंद करण्यासाठी एमएमपीसीबी आणि पालिकेच्या पर्यावरण विभागाने आता वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार मुंबईतील २७६ बेकऱ्यांवर पालिकेच्या पर्यावरण विभागाने नोटीस बजावली आहे. येत्या वर्षभरात बेकऱ्यांमध्ये इंधन म्हणून इलेक्ट्रिक शेगडी किंवा सीएनजीचा वापर न केल्यास त्यांना टाळे ठोकण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.
माझगाव, धारावीसह मुंबईतील विविध भागात जवळपास १,२०० बेकऱ्या चालवल्या जात असून, यातील निम्म्याहून अधिक बेकऱ्या अनधिकृत आहेत. यापूर्वी पालिकेकडून इलेक्ट्रिक वापराच्या अटीवर सुमारे ३५० बेकऱ्यांना परवानगी दिली आहे. मात्र त्यातील अनेक बेकऱ्या आजही या नियमाचे पालन करताना दिसत नाहीत. येथील कोळसा, लाकडाच्या वापरामुळे प्रदूषण होत असून आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत आहे. येथील वाढत्या प्रदूषकांच्या उत्सर्जनामुळे वायू प्रदूषणात आणखी भर पडते आहे. त्यामुळे पालिकेने आता अशा बेकऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला असून २७६ बेकरीचालकांना नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर वर्षभरात बेकऱ्याचालकांनी नियमानुसार बदल न केल्यास अशा बेकऱ्या बंद करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा पर्यावरण विभागाने दिला आहे.
भंगरातील लाकडाचा अनेक बेकऱ्यांत वापर
अनेक बेकऱ्यांत इंधन म्हणून कोळसा, लाकडाचा वापर केला जातो. त्यातही छोट्या बेकरींमध्ये दररोज ५० ते १०० किलो, तर मोठ्या बेकऱ्यांमध्ये २५० ते ३०० किलो लाकूड वापरले जाते.
२० किलो मैद्यापासून पाव तयार करण्यासाठी साधारण ५ किलो लाकडाची गरज भासते. मात्र साधारण लाकडापेक्षा भंगारातील लाकूड स्वस्त असल्याने ते येथे जास्त वापरले जाते.
लाकूड जाळल्याने त्यातून मिथेन, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड, अस्थिर सेंद्रिय संयुगे यांसारखे आरोग्यास हानिकारक वायू बाहेर पडतात. त्यातून खोकला अन् श्वसनाचे आजार, अस्थमा असे गंभीर आजार- देखील होऊ शकतात. या धुरामुळे काही सूक्ष्मकण फुप्फुसांमध्ये पोहोचतात आणि त्याने कर्करोग, रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारही होऊ शकतात, अशी माहिती पालिकेने दिली आहे.