मुंबई : एरवी उपनगरीय लोकल प्रवाशांना सवयीचा झालेला तांत्रिक बिघाड आता विमान प्रवाशांच्या बाबतीतही घडू लागला आहे. ब्रिटिश एअरवेजचे फ्लाइट ‘बीए १९८’ या विमानाने सोमवारी मुंबईहून लंडनसाठी उड्डाण घेतले. मात्र, हे विमान तांत्रिक बिघाडामुळे अजरबैजान येथील बाकू येथे उतरवण्यात आले. या विमानात अडकून पडलेल्या प्रवाशांमध्ये स्टेट बँक आॅफ इंडियाच्या माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यादेखील होत्या.मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळावरून ब्रिटिश एअरवेजचे बीए १९८ हे विमान सोमवारी मुंबई-लंडन असा प्रवास करणार होते. या विमानाच्या उड्डाणाची पूर्वनियोजित वेळ दुपारी १.१५ मिनिटे होती. तथापि, विमानाने तब्बल ४ तास उशिराने म्हणजेच सायंकाळी ५ वाजून १४ मिनिटांनी उड्डाण केले. विमानातील फर्स्ट क्लास कक्षातून धूर येत असल्याने वैमानिकाने आपत्कालीन परिस्थिती घोषित केली. त्यामुळे हे विमान लंडनऐवजी अजरबैजान येथील बाकू येथे उतरवण्यात आले. आधीच उड्डाणाला विलंब आणि त्यात विमानात तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती.या घटनेनंतर ब्रिटिश एअरवेजच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, प्रथम दर्जा कक्षात काही तांत्रिक बिघाड झाला. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वैमानिकाने आपत्कालीन परिस्थितीत अजरबैजान, बाकू येथे विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. तांत्रिक बिघाडामुळे विमानातून धूर येत होता. हा बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, ब्रिटिश एअरवेजने पर्यायी विमानाची सोय करून प्रवाशांना लंडनच्या दिशेने मार्गस्थ केले. प्रवाशांना होणाºया विलंबामुळे ब्रिटिश एअरवेजने माफी मागितली आहे.जमिनीवर झोपून काढली रात्रस्टेट बँक आॅफ इंडियाच्या माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांच्यासह १२ भारतीय प्रवासी या विमानाने प्रवास करत होते. विमान ८ वाजून ५४ मिनिटांनी बाकू येथे पोहोचले. ११.३० मिनिटांपर्यंत प्रवासी विमानात बसून होते. या वेळी विमानातील प्रकाशदिवे आणि स्क्रीन बंद ठेवण्यात आल्या होत्या. केवळ ‘आप्तकालीन परिस्थिती’ अशी उद्घोषणा सुरू होती. बाकू येथे विमान उतरल्यानंतर प्रवाशांना ब्रिटिश एअरवेजकडून कोणतीही सुविधा देण्यात आली नाही. कमी कालावधीसाठी व्हिसा देण्यास संबंधित प्रशासनाने नकार दिला. परिणामी, प्रवाशांना विमानतळावरील जागेत जमिनीवर झोपून रात्र काढावी लागली.प्रवाशांची ट्विटरवर नाराजीमुंबईतून उड्डाण होते वेळीच प्रवासाला ग्रहण लागल्याचे चित्र होते. कारण लंडन येथे बर्फवृष्टी होत असल्यामुळे मुंबईतून विमानाचे उड्डाण नियोजित वेळेपेक्षा चार तास उशिराने झाले, असे सांगण्यात आले. त्यानंतर विमानाने उड्डाण घेतले. मात्र, या वेळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगून बाकू येथे उतरवण्यात आले. विमान प्रवासातदेखील विलंब आणि तांत्रिक बिघाडामुळे मनस्ताप सहन करावा लागणे, हे चुकीचे आहे, अशी खंत व्यक्त करत प्रवाशांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त केली.
लंडनऐवजी विमान पोहोचले ‘बाकू’ला, ब्रिटिश एअरवेज ‘बीए १९८’मध्ये तांत्रिक बिघाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 2:21 AM