बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक 'अंडरग्राउंड', महापौर बंगला 'जैसे थे' राहणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 10:42 AM2018-09-04T10:42:15+5:302018-09-04T10:44:56+5:30
मुंबईतील महापौर बंगल्याची वास्तू 2300 स्वेअर फूट एवढी असल्याने बाळासाहेबांचे स्मारक बांधण्यासाठी वास्तूची जागा अपुरी पडते.
मुंबई - दिवंगत शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आता महापौर बंगल्याऐवजी बंगल्याच्या तळघरात (अंडरग्राऊड) होणार आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ऐतिहासिक वास्तू असलेल्या या बंगल्याची कुठलिही तोडफोड किंवा येथील झाडांचीही कत्तल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या महापौर बंगल्याला ऐतिहासिक वारसा असून पुरातत्व विभागाकडून 'ब' दर्जा मिळालेला आहे. त्यामुळेच या वास्तूचे जतन करुन त्याचे पर्यटनात रुपांतर होईल. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीच पुढाकार घेतला आहे.
मुंबईतील महापौर बंगल्याची वास्तू 2300 स्वेअर फूट एवढी असल्याने बाळासाहेबांचे स्मारक बांधण्यासाठी वास्तूची जागा अपुरी पडते. तर अंडरग्राऊंड परिसर हा तब्बल 9000 स्वेअर फूटांवर पसरलेला आहे. त्यामुळे स्मारकासाठी अंडरग्राऊंड परिसराचा पुरेपूर वापर होईल आणि बंगला परिसरातील लॉन्सही अबाधित राहिल. मुंबई ऐतिहासिक वारसा संवर्धन समितीने नुकतीच महापौर बंगल्याला भेट दिली. त्यावेळी समितीकडून या बंगल्याचे आणि पुतळ्यासंदर्भात घेण्यात आलेल्या नवीन निर्णयाचे कौतूक करण्यात आले. सन 1928 साली हा बंगला बांधण्यात आला होता, त्यानंतर 1962 साली बीएमसीने हा बंगला विकत घेतला. तर डॉ. बीपी. देवगी यांना महापौर म्हणून या बंगल्यात राहण्याचा पहिला मान मिळाला. सन 1964-65 मध्ये या बंगल्याचा महापौरांसाठी अधिकृतपणे वापर करण्यात आला. बाळासाहेब ठाकरे ज्या शिवाजी पार्कमधून दसरा मेळाव्याला शिवसैनिकांना संबोधित करायचे, तेथून जवळच हा महापौर बंगला आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकासाठी हेच ठिकाण उत्तम असल्याचेही समितीने म्हटले आहे.
बाळासाहेबांच्या स्मारकासाठी नवीन प्लॅन तयार करण्यात आला असून त्याचे डिझाईन आर्किटेक आभा नरेन लांबा यांनी बनवले आहे. त्यानुसार, बंगला परिसरातील उत्तर-पूर्वेला असणारी नोकर आणि ड्रायव्हर्सची घरे पाडण्यात येणार असून तेथे पर्यटकांसाठी सोयी-सुविधा करण्यात येणार आहेत. तर दक्षिण-पूर्वेला पार्किंगसाठी जागा ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी बंगला परिसरातील आवारात काही बदल करण्यात येणार आहेत. दरम्यान, या बंगल्यात बाळासाहेबांच्या कार्टुनचे प्रदर्शन भरविण्यात येईल. बाळासाहेबांचे स्मारक होण्यासाठी ऐतिहासिक वास्तूची मोडतोड केली जाऊ नये, अथवा बंगला परिसरातील झाडांचीही कत्तल होऊ नये, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची इच्छा असल्याचे पुरातत्व विभाग आणि संवर्धन समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच या बंगल्यात आपण बाळासाहेबांनी काढलेले कार्टुन्स आणि त्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवू, असेही उद्धव यांनी म्हटले आहे.