मुंबई – अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राम मंदिर भूमीपूजनानिमित्त सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे, देशात उद्या हा सोहळा भव्यदिव्य स्वरुपात लोकं साजरे करणार आहेत. या पार्श्वभूमीवर अनेकांनी १९९२ मधील अयोध्येतील त्यादिवशाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यात तत्कालीन शिवसेनेचे नेते सध्या मनसेत असलेले बाळा नांदगावकर यांनीही गर्व है हम हिंदू है अशा शब्दात आपली भावना व्यक्त केली आहे.
याबाबत बाळा नांदगावकर म्हणतात की, उद्या राममंदिराचे भूमिपूजन होत आहे, करोडो लोकांचे ,अनेक पिढ्यांचे स्वप्न आज प्रत्यक्षात येत आहे. परंतु हा दिवस येण्यामागे लाखो लोकांचा संघर्ष आहे आणि मला अतिशय गर्वाने नमूद करावेसे वाटते की त्यात माझा ही खारीचा वाटा आहे. मुंबई महापालिकेचा नगरसेवक असतांना १९९२ मध्ये बाळासाहेबांच्या आदेशाने आम्ही त्यावेळचे सहकारी नगरसेवक सुभाष कांता पाटील, दिगंबर कादंरकर, जयवंत परब, के पी नाईक, श्रीकांत सरमळकर,विलास अवचट,विश्वनाथ नेरुरकर, अनंत भोसले असे आम्ही सर्व कारसेवक म्हणून सामील झालो. प्रथम फैसाबाद येथे गेलो व तिथून बसने अयोध्येकडे मार्गस्थ झालो. अतिशय तंग असे वातावरण त्यावेळी होते, कोणत्याही क्षणी कुठूनही हल्ला होण्याची, पोलीसांचा गोळीबार होऊन जिव जाण्याची शक्यता ही त्यावेळी होती. परंतु एक अतिशय वेगळेच स्फूर्तिदायक वातावरण त्यावेळी होते व त्यासमोर ही मरणाची भीती आम्हाला कुठेही जाणवली नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच थेट विवादित ढाचा पाडण्यात जे अग्रेसर होते त्यापैकी एक असण्याचे भाग्य मला लाभले, त्यामुळे राम मंदिराचे महत्त्व आमच्यासाठी काय आहे हे शब्दांत सांगणे कठीण. विवादित ढाचा जमीनदोस्त करून तेथून निघतांना ज्या विटा तिथे मंदिरासाठी जमा झाल्या होत्या त्यातील 2 विटा आठवण म्हणून मी सोबत घेऊन निघालो. काही काळाने माझंगाव कोर्टाच्या बाजूला शिवसेनेच्या नवीन कार्यालयाच्या पायाभरणीच्या वेळी त्या 2 विटा आम्ही तेथे ठेवल्या. आता तिथे सध्या शिवसेनेची शाखा आहे. आज हे सर्व आपणासमोर ठेवण्याचे कारण की ते म्हणतात ना स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसेच रामजन्मभूमीशी हे थेट "रक्ताचे" नाते असल्याने या भूमीपूजनाचे महत्त्व काही औरच आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
दरम्यान, मागे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावर राजसाहेब बोलले होते, की आज बाळासाहेब असायला हवे होते, खरंच अगदी तिच भावना आज सर्वांची आहे. राजसाहेब सुद्धा सुरवातीपासून हेच जाहीर सभेत व अनेक ठिकाणी कायम बोलत आले की राममंदिर व्हायलाच हवे व भव्य असेच व्हावे. युतीच्या अगदी सुरुवातीच्या काळात एक घोषणा घरोघरी पोहचली होती की, "गर्व से कहो हम हिंदू है" पण आज हा एक अध्याय पूर्ण होत असतांना व याची देही याची डोळा राममंदिर आपण सर्व जण लवकरच पाहणार आहोत व त्या अनुषंगाने माझ्या मनात एक नवीनच घोषणा अनेक दिवसांपासून येत आहे व ती म्हणजे "गर्व हे हम हिंदू है". सर्व धर्माचा व धर्मियांचा सन्मान आपण कायमच राखतो व राखूच, परंतु हे करतांना आपल्या "हिंदू" धर्माचाही आपणांस अभिमान हा असलाच पाहिजे. उगाच धर्मनिरपेक्षतेच्या (Secularism) नावाखाली आपल्याच धर्माची खिल्ली उडविणे हे अतिशय घृणास्पद असेच आहे. बाळासाहेबांमुळेच एवढे मोठे पुण्याचे काम कारसेवक म्हणून करता आले त्याबद्दल त्यांचा मी कायमच ऋणी आहे व राहील असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.