मुंबई - येत्या २३ जानेवारी रोजी मनसेचं पहिलं महाधिवेशन मुंबईत होणार असून तत्पूर्वी मनसे नव्या रुपात सर्वांच्या समोर येणार असल्याची चर्चा सुरु झाली. मनसेच्या झेंड्यात तसेच धोरणात काही बदल होतील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: ते जाहीर करतील अशी चर्चा मनसेच्या वर्तुळात सुरु आहे. याबाबत बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही संकेत दिले आहेत.
एबीपी माझाशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, यापूर्वी शिवसेनेलाही आम्ही मदत केली, भाजपालाही मदत केली आहे, काँग्रेस-राष्ट्रवादीलाही मदत केली आहे. आम्हाला कोणी मदत केली हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे भविष्यात कोणासोबत जायचं न जायचं हा निर्णय पक्षप्रमुख राज ठाकरे घेतील. कोणताही पक्ष एकमेकांचा शत्रू नसतो, त्यामुळे जे लोकांच्या मनात आहे ते घडताना दिसत आहे असं सांगत त्यांनी भाजपा-मनसे एकत्र येऊ शकतात असे संकेत दिले आहेत.
मात्र ज्या पक्षाचा भूतकाळ आणि वर्तमान पाहता सध्या ही चर्चा नाही. मात्र भविष्यात काहीही होऊ शकते. समविचारी पक्षांनी एकत्र येण्यास काय अडचण नाही. भाजपा आणि मनसेची विचारधारा सध्या वेगळी आहे. कार्यकर्त्यांमध्ये विसंगती आहे. त्यामुळे भविष्यात मनसेची ध्येय धोरणं बदलली तर काहीही होऊ शकतं अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार राम कदम यांनी दिली आहे.
महाविकास आघाडीमुळे विरोधी पक्षाचा स्पेस भरुन काढण्याचा प्रयत्न मनसे करत आहे. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे घडलं. त्यामुळे भाजपालाही राज्यात प्रादेशिक पक्षाची गरज लागणार आहे. राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका स्वीकारल्यानंतर मनसे-भाजपा एकमेकांच्या जवळ येऊ शकतात असं सांगितलं जात आहे.
दरम्यान, मनसे नव्याने उभारी घेईल हे सत्य आहे. सर्वच स्तरावर मनसे बदलेली असेल हे नक्की आहे. धोरणात्मक आणि अमुलाग्र बदल होताना पक्षात दिसतील. पक्षाचे इंजिन चिन्ह भविष्यातही तेच राहील यात अडचण नाही. मात्र १२ वर्ष झाल्यानंतर संघटनेत बदलत्या काळानुसार काही बदल करणं योग्य वाटतं ते आम्ही करत आहोत. नवीन ऊर्जा, नवीन बळ देणारी संघटना २३ तारखेला सगळ्यांना दिसेल असं सांगत नितीन सरदेसाई यांनी मनसेच्या नव्या भूमिकेचे संकेत दिले आहेत.