Raj Thackeray MNS Padwa Melava: मराठी नववर्ष आणि गुढीपाडवा राज्यभर साजरा होत आहे. यानिमित्ताने राज ठाकरेंची सभा आहे. शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा आहे. पाडवा मेळाव्यात राज ठाकरे कुणाकुणावर निशाणा साधणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडाच्या पार्श्वभूमीवरही राज ठाकरे काही भाष्य करतात का, याकडेही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज ठाकरे यांची ही सभा टर्निंग पॉइंट असेल, असा दावा मनसे नेत्यांनी केला आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याला होत असलेल्या सभेबाबत प्रतिक्रिया दिली. सभेची जोरदार तयारी झाली आहे. ठाणे, पुणे, नाशिकमधून मनसे सैनिक आले आहेत. सर्वच जण राज ठाकरे यांच्या सभेची वाट पाहत आहेत. तर मनसे नेत्यांनीही राज साहेब, सत्य तेच बोलतात. ते कुणालाही सोडत नाही. राज ठाकरे यांची सभा ही टर्निंग पॉइंट ठरण्याचा दावा बाळा नांदगावकर यांनी केला.
बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा खरा वारसा राज ठाकरेंकडे
देशासाठी आणि राज्यासाठी काय महत्त्वाचे विषय असायला हवेत यावर राज ठाकरे भाष्य करत असतात. कारण ते शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मानतात. त्यामुळे त्यांचे आजचे भाषण काय असेल याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. माझ्यासह सर्वांना त्यांच्या भाषणाची उत्सुकता लागली आहे. त्यांचे भाषण ऐकून सर्वच आनंदी होतील. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा खरा वारसा राज ठाकरे यांच्याकडे आहे हे आता लोकही बोलायला लागले आहेत. कारण राज ठाकरे यांचे भाषणही बाळासाहेबांसारखेच असते, असे बाळा नांदगावकर म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरेंचे भाषण काहीतरी वेगळे असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. राज ठाकरे जे सत्य आहे तेच बोलत असतात. त्याबद्दल ते कोणालाच सोडत नाही. मग तो कोणत्याही पक्षाचा असो, भाजप असो की काँग्रेस असो. २००७ साली मनमोहन सिंह यांनी अणू करार केला होता. तेव्हा त्याचे राज ठाकरे यांनी स्वागत केले होते. नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली तेव्हा विरोध केला होता. मात्र ३७० कलम रद्द केले तेव्हा त्यांनी मोदींचे अभिनंदन केले होते. त्यामुळे ते जे काही आहे ते सत्य बोलतात. आज त्यांची ठाकरी भाषा लोकांना पाहायला मिळेल. ही सभा टर्निंग पाँईट झाली तर आश्चर्य वाटायला नको, असेही बाळा नांदगावकर म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"