Join us

“२५० जागांवर तयारीचे राज ठाकरेंचे आदेश, स्वबळावर विधानसभा निवडणूक...”: बाळा नांदगावकर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 7:33 PM

MNS Bala Nandgaonkar News: मनसेचे पदाधिकारी लवकरच संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

MNS Bala Nandgaonkar News: लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. मनसेची पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पडली असून, त्यामध्ये एकमताने राज ठाकरेंची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमानुसार निवड झाली असून, राज ठाकरेमनसे पक्षाचे २०२८ पर्यंत अध्यक्ष असणार आहेत, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत २२५ ते २५० जागांवर तयारी करण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिल्याचे सांगितले.

पत्रकारांशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, आमचे कोणासोबतही बोलणे सुरू नाही. आतापर्यंत आम्ही स्वबळावर निवडणुका लढवल्या आहेत. पुढे काय होते ते माहिती नाही पण आम्ही आमची तयारी करत आहोत. माध्यमांमध्ये ज्या बातम्या येत आहेत. त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. बैठकीत राज ठाकरेंनी आदेश दिला त्याप्रमाणे आम्ही २२५ ते २५० जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. ज्या मतदरासंघात आम्हाला आजपर्यंत चांगली मते मिळाली आहेत, त्या मतदारसंघात आम्ही निश्चित आमचे उमेदवार देऊ, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.

मनसे विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार का?

मनसेचे पदाधिकारी लवकरच संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. यादरम्यान ते प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतील, तसेच त्यासंदर्भातील अहवाल राज ठाकरे यांना सादर केला जाईल, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांनी मनसे विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार का, असा प्रश्न बाळा नांदगावकर यांना विचारला. यावर, पुढे काय होणार, हे आताच सांगता येणार नाही. आम्हाला तयारी तर करावी लागेल. प्रत्येक जण आपला पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानुसार आम्ही आमचा पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, १४ जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस असून, आतापासूनच शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थवर मनसैनिकांनी, पदाधिकाऱ्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून कुणीतरी पुडी सोडली की, मनसेने विधानसभेसाठी २० जागा मागितल्या. विधानसभेच्या जागा मागण्यासाठी कुणाच्या दारात जाणार नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे.

 

टॅग्स :बाळा नांदगावकरमनसेराज ठाकरे