मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना धमकी प्रकरण आता तापण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारने त्यांची सुरक्षा काही महिन्यांपूर्वी काढून घेतली आहे. यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज ठाकरेंना सातत्याने धमक्या येत असतात, गेल्या बऱ्याच महिन्यांपासून सरकारसह गृह खाते, पोलीस आयुक्त आणि डीजी यांना मी माहिती देत होतो, असे नांदगावकर म्हणाले.
मध्यंतरी राज्य सरकारने त्यांची झेड सिक्युरिटी काढून घेतली होती. मी आमच्या पक्षाचे शिष्टमंडळ घेऊन सेवा गिरी बंगल्यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना स्वतःच्या सहीचे पत्र घेऊन भेटलो होतो. तेव्हा वळसे पाटलांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. परंतू आज दोन महिने झाले तरी त्यांना सुरक्षा देण्यात आलेली नाही, असा आरोप नांदगावकर यांनी केला आहे.
गुढीपाडव्याला जेव्हा राज ठाकरे यांनी आपली जी भूमिका मांडली. भोंग्यांविषयी मांडलेल्या भूमिकेमुळे देशात आणि राज्यात सामाजिक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांना कालपासून सोशल मीडिया वर प्रचंड धमक्या येणे सुरू झाले आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेकडून धमकी आलेली आहे, आजच पत्रक तयार केले आहे ते पत्र पोलीस आयुक्त, डीजी, गृहमंत्री आयबी यांना देणार असल्याचे नांदगावकर म्हणाले. याचसोबत केंद्र सरकारलाही आणि अमित शहांनाही पत्र देणार असल्याचे ते म्हणाले.
राज्य सरकारने राज ठाकरेंना झेड प्लस सुरक्षा द्यावी. त्याच बरोबर राज ठाकरेंसोबत त्यांच्या कुटुंबियांना देखील सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी करणार आहे. मुंब्रा सारख्या ठिकाणी आम्हाला चिथावणी देणारे भाषण करणार असाल तर आम्ही हातावर हात ठेवून गप्प बसणार नाही, असा इशाराही नांदगावकर यांनी दिला आहे. नाशिक पोलीस आयुक्तांनी जो निर्णय घेतलेला आहे, त्या निर्णयावर राज्यसरकार बैठक घेणार असून या बैठकीत काय निर्णय होतंय हे पाहू, आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. उच्च न्यायालयाचा सन्मान राखून या सगळ्यांनी आपले भोंगे खाली उतरवले पाहिजेत, नाही उतरवले तर आम्ही हनुमान चालीसा वाचणार आहोत असा इशाराही त्यांनी दिला.