बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी शिवाजी पार्कवर राजकीय मांदियाळी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 03:27 AM2019-11-18T03:27:26+5:302019-11-18T03:27:59+5:30
नव्या सत्ता समीकरणाची झलक
मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनी रविवारी शिवाजी पार्कवर सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. भाजप-शिवसेना युतीचा काडीमोड आणि राज्यातील नव्या सत्तासमीकरणाचे प्रतिंिबंबही या गर्दीत उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ आदी नेत्यांनी आवर्जून हजेरी लावली, तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्मृतिस्थळी येऊन आदरांजली वाहिली.
मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजप युतीत वितुष्ट निर्माण झाले आहे. सत्ता स्थापनेबाबत शिवसेना नेतृत्वाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर रविवारी राज्यभरातील शिवसैनिकांनी आवर्जून शिवाजी पार्कात हजेरी लावत एक प्रकारे शक्तिप्रदर्शनच केले. शिवसेना राज्यात सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात असल्याने यंदाच्या स्मृतिदिनी शिवाजी पार्कवर रेकॉर्डब्रे्रक गर्दी पाहायला मिळाली. बाळासाहेबांना आवडणारी चाफ्याची फुले आणि हार हाती असलेल्या चाहत्यांनी सकाळी सहा वाजल्यापासूनच स्मृतिस्थळावर गर्दी केली होती.
‘आवाज कुणाचा, शिवसेनेचा’, ‘शिवसेना झिंदाबाद’ या पारंपरिक घोषणांसोबतच ‘अब की बार ठाकरे सरकारऽ’ अशा घोषणा उपस्थित शिवसैनिक देत होते. दुपारी बाराच्या सुमारास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबीयांनी आदरांजली वाहिली. उद्धव ठाकरे येताच ‘कोण आला रे, कोण आला; शिवसेनेचा वाघ आला’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
चाफ्याच्या फुलांसह रंगीबेरंगी फुलांनी स्मृतिस्थळ सुशोभित करण्यात आले होते. तर, स्मृतिस्थळासमोर ‘जय श्रीराम’ अशी फुलांची आरास करण्यात आली होती. राज्यभरातून आलेल्या शिवसैनिकांसाठी शिवाजी पार्कवर सकाळपासूनच चहा, नाश्ता, जेवण आणि पाण्याच्या व्यवस्थेसाठी स्टॉल उभारण्यात आले होते. आरोग्य तपासणीचीही व्यवस्था करण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
राष्ट्रवादीची हजेरी
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह जितेंद्र आव्हाड आणि प्रकाश गजभिये या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्मृतिस्थळी येऊन अभिवादन केले. ‘रोजच बाळासाहेबांची आठवण येत असते.
राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आणेन, असे उद्धव यांनी बाळासाहेबांना दिलेले वचन पूर्ण करण्यास आपण सर्वतोपरी मदत करणार आहोत,’ असे भुजबळ या वेळी म्हणाले. तर काँग्रेस आमदार भाई जगताप आणि कृपाशंकर सिंह यांचा अपवाद वगळता काँग्रेसच्या अन्य बड्या नेत्यांनी मात्र शिवाजी पार्ककडे पाठ फिरवल्याचे दिसले.
भाजप नकोच, शिवसैनिकांची भावना
भाजपसोबतची तीन दशकांची युती मुख्यमंत्रिपदावरून फिस्कटली ते बरेच झाल्याची भावना शिवसैनिकांकडून व्यक्त होत होती. युतीत आमची २५ वर्षे सडल्याची उद्धव ठाकरे यांची भावना खरीच आहे. त्यामुळे आता भाजपची साथसोबत नकोच. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेत आता शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवायचाच, असा निर्धार शिवसैनिक बोलून दाखवत होते.
ठाकरे गेले आणि फडणवीस आले
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी दीडच्या सुमारास स्मृतिस्थळावर आले. या वेळी भाजप नेते विनोद तावडे आणि पंकजा मुंडेही होत्या. फडणवीस यांच्या स्वागताला शिवसेनेचा कोणीही मोठा नेता हजर नव्हता. विशेष म्हणजे अवघ्या काही मिनिटांपूर्वी उद्धव यांच्यासह ठाकरे कुटुंबीय शिवाजी पार्कबाहेर पडले. उद्धव यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनी फडणवीस यांचे स्वागत केले.
मुस्लिमांकडून भगवी चादर
यंदाच्या स्मृतिदिनी शिवाजी पार्कवर मुस्लीम शिवसैनिकांची उपस्थिती विशेषत्वाने जाणवत होती. भगवे कपडे, उपरणे आणि डोक्यावर टोपी अशा वेशातील चाहत्यांची गर्दी शिवाजी पार्क परिसरात दिसत होती. या वेळी काही चाहत्यांनी भगवी चादरही स्मृतिस्थळावर चढवली.
‘आम्हाला शहाणपण शिकवू नका’
स्मृतिस्थळावर दाखल होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी टिष्ट्वटरवर बाळासाहेबांना अभिवादन केले. बाळासाहेबांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या आणि स्वाभिमानाच्या शिकवणीचा यात उल्लेख होता. यावरून राजकीय टोलेबाजी झाली. आम्हाला कोणी शहाणपण शिकवू नये.
हिंदुत्व, राष्ट्रीयत्व, स्वाभिमान या सर्वांची त्यांना उत्तरे दिली जातील. काहीही झाले तरी सत्ताकेंद्र मातोश्री असेल, अशा शब्दांत संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या या टिष्ट्वटला प्रतिउत्तर दिले.
पवारांनी वाहिली ट्विटरवर आदरांजली
प्रादेशिक अस्मितेचा हुंकार स्वाभिमानाने मिरवणारा मराठी माणूस स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केला. समाजकारणाला अग्रक्रम देणारं राजकारण, अमोघ वक्तृत्व, रोखठोक स्वभाव यामुळेच त्यांना अनुयायांचं निरपेक्ष आणि चिरंतर प्रेम मिळालं. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाळासाहेबांना ट्विटरद्वारे आदरांजली वाहिली.