शिक्षणापासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘बालकमित्र’आला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 01:22 AM2020-08-14T01:22:45+5:302020-08-14T01:22:52+5:30

पालिकेच्या शिक्षण विभागाचा उपक्रम; ऑनलाइन शिक्षण

'Balakmitra' for students who have been deprived of education! | शिक्षणापासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘बालकमित्र’आला!

शिक्षणापासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘बालकमित्र’आला!

Next

मुंबई : पालिका शिक्षण विभागाच्या माहितीनुसार अद्याप २० ते २५ टक्के विद्यार्थी कोणत्याही माध्यमातून शिक्षक आणि शाळेच्या संपर्कात नाहीत. हे विद्यार्थी आॅनलाइन शिक्षणापासून वंचित असून ते शिक्षण प्रवाहाबाहेर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. त्यासाठी विद्यार्थीनिहाय माहिती जमा करण्यापासून बालकमित्र, पालकमित्र, स्थानिक समाजसेवक यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होण्याबाबत अद्यापही संभ्रम आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या आॅनलाइन शिक्षणापासून मुंबई महापालिकेच्या शाळांमधील २५ टक्के विद्यार्थी वंचित आहेत. मुंबई महापालिकेशी संलग्न असलेल्या शाळांमध्ये २ लाख ८३ हजार ८७६ विद्यार्थ्यांपैकी २५ हजार ६३६ विद्यार्थी स्थलांतरित झाले आहेत. यामध्ये पालक मूळगावी गेल्याने विद्यार्थ्यांशी संपर्क तुटला आहे. यामुळे पालिकेतील अनेक विद्यार्थी आॅनलाइन शिक्षणापासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांची सद्यस्थिती मिळवण्याच्या सूचना पालिकेच्या शिक्षण विभागाने शिक्षकांना दिल्या आहेत.

वर्गनिहाय समिती, मुख्याध्यापक, पालिका अधिकारी, स्थानिक समाजसेवक यांची समिती नेमण्याच्या सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिल्या आहेत. वर्गातील दोन कार्यशील पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, स्वयंसेवी संस्था, मुख्याध्यापक, शाळा निरीक्षक यांचा समावेश असणार आहे. या समित्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवण्यात येणार असून, वर्गातील संपर्कात नसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती देण्यात येणार आहे, अशा सूचना मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.

जे विद्यार्थी मुंबईत आहेत, मात्र केवळ सुविधांच्या अभावी ते आॅनलाइन शिक्षणापासून वंचित राहत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही हे प्रयत्न करत आहोत. शिक्षकांचा सहभाग तर यामध्ये असेलच, मात्र सहविद्यार्थी, मोठे विद्यार्थी आणि पालकांच्या मदतीने शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा आणण्यासाठी हे प्रयत्न आहेत. विद्यार्थी शाळाबाह्य होऊ नये हा यामागचा उद्देश आहे.
- महेश पालकर, शिक्षणाधिकारी, पालिका शिक्षण विभाग

Web Title: 'Balakmitra' for students who have been deprived of education!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.