शिल्लक : खाकीतील पर्यावरणप्रेमीने घरातच फुलवली ११० झाडांची बाग..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:06 AM2021-06-26T04:06:48+5:302021-06-26T04:06:48+5:30
घरातील टाकाऊ पदार्थांपासून तयार करतात खत, म्हणे कोरोनाच्या काळात मिळते सकारात्मक ऊर्जा खाकीतील पर्यावरणप्रेमीने घरातच फुलवली ११० झाडांची बाग.. ...
घरातील टाकाऊ पदार्थांपासून तयार करतात खत,
म्हणे कोरोनाच्या काळात मिळते सकारात्मक ऊर्जा
खाकीतील पर्यावरणप्रेमीने घरातच फुलवली ११० झाडांची बाग..
घरातील टाकाऊ पदार्थांपासून तयार करतात खत,
म्हणे कोरोनाच्या काळात मिळते सकारात्मक ऊर्जा
मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विविध डोंगर सर करण्याबरोबरच पॅराग्लाइडिंग, रॅपेलिंग, स्कूबा असे विविध साहसी छंद जोपासण्याबरोबरच खाकीतील सचिन चव्हाण या पर्यावरणप्रेमीने निसर्गाप्रती प्रेमाची भावना रुजविण्यासाठी घरातच बाग फुलवली आहे. त्यांच्या बागेत सध्या ११० प्रकारच्या वेगवेगळ्या फुले आणि फळभाज्यांच्या झाडांचा समावेश आहे. कोरोनाच्या काळात हीच झाडे त्यांना सकारात्मक ऊर्जा देत असल्याचे चव्हाण सांगतात.
इंजिनियर होण्यासाठी धडपड सुरू असताना रत्नागिरीतील खेडचे रहिवासी असलेल्या चव्हाण यांना मुंबई पोलीस दलात कर्तव्य बजावण्याची संधी मिळाली. २००० साली ते पोलीस दलात रुजू झाले. पोलीस दलात त्यांना २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. १५ वर्षे गुन्हे शाखेत धडाकेबाज कामगिरी केल्यानंतर ते सध्या वाहतूक विभागाच्या शिक्षण शाखेत पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्याची जबाबदारी त्यांच्या शाखेवर आहे. कोरोनाच्या काळातही त्यांचे वाहतूक सुरक्षेचे ऑनलाईन धडे सुरू आहेत.
कोरोना काळात विविध बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडत असताना, ते आपली घरातली बाग फुलवताना दिसत आहेत. चव्हाण सांगतात, सर्वांनीच पर्यावरणाचे रक्षण करायला हवे. मीही आधी माझ्या घरातून याचे महत्त्व पटवून देण्यासाठी जास्तीत जास्त झाड़े लावण्याचे ठरवले. घाटकोपर येथे नवीन घरी राहण्यास आल्यानंतर झाड़े लावण्यामध्ये स्वतःला व्यस्त ठेवायला लागलो. कोरोनाच्या काळात हीच झाड़े माझ्यासाठी सकारात्मक ठरत आहेत. १६ प्रकारची जास्वंदीची फुले, वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब, अनंता, मोगरासह विविध फुलांसह फळभाज्यांची झाडेही त्यांनी लावली आहेत. ते सांगतात, चार वर्षापूर्वी तुळशीच्या रोपट्यापासून सुरू केलेल्या प्रवासात आज ११० झाडांचा यात समावेश आहे.
घरातील जेवण बनविल्यानंतर शिल्लक राहिलेले अन्न, भाजीपाल्याचा कचरा एकत्र करून त्याचे खत तयार करतात. याच खताचा वापर ते झाडांसाठी करत आहेत. जास्तीत जास्त पर्यावरणपूरक वस्तू वापरण्यावर त्यांचा भर असतो. मुलांसह संपूर्ण कुटुंबाला ते यामध्ये व्यस्त ठेवत आहेत. ते म्हणतात, सध्या ही झाड़े माझ्या मुलांप्रमाणे वाटतात. सकाळ आणि रात्र त्यांच्यासोबतच सुरू होते आणि संपते.
ते सांगतात, सध्या नागरिकांची ऑक्सिजनसाठी होणारी वणवण पाहिली. त्यामुळे सर्वांनीच निसर्गाचा आदर करत एक तरी झाड़ लावायला हवे. आपल्यातील कलेला वाव द्यायला हवा. मिळालेल्या वेळेत प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवायला शिकायला हवे. तसेच फिटनेसवर भर देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
.....
कर्तव्याबरोबरच सामाजिक बांधिलकी...
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात खासगी इमारतीतील रहिवासी स्वखर्चाने इमारतींचे सनिटायझेशन करून घेत असताना, कामाला जाताना, येताना चव्हाण यांची नजर पोलीस वसाहतीवर पडली. आपल्याच सहकाऱ्यासह त्याच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी त्यांनीही पोलीस वसाहतीतील शक्य तितक्या इमारतींंचे सॅनिटायझेशन करायचे ठरवले.
कामावर जाताना सोबत सॅनिटायझेशनची मशीन घेऊन निघायचे. कामावर जाताना आणि घरी येताना वाटेत लागणाऱ्या पोलीस वसाहतीतील इमारतीचे सॅनिटायझेशन करण्याचा त्यांचा दिनक्रम ठरलेला. गेल्यावर्षी एप्रिल ते जूनदरम्यान पोलीस वसाहतीतील १०० इमारती आणि २५ सरकारी कार्यालयांचे त्यांनी सॅनिटायझेशन केले होते.
....
सांस्कृतिक कार्यक्रमाची गोडी
नृत्याबरोबरच ढोल-ताशा वाजविण्याची आवड असलेले चव्हाण हे विविध सांस्कृतिक कार्यक्रमातही आपली कला जोपासताना दिसत आहेत.
....