बालगुन्हेगारांचे होतेय पुनर्वसन!
By admin | Published: February 9, 2015 02:02 AM2015-02-09T02:02:41+5:302015-02-09T02:02:41+5:30
लहान वयातच आई-वडिलांचे छत्र हरवलेली अनेक मुले गुन्हेगारीकडे वळत असतात. मात्र अशा मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत
मुंबई : लहान वयातच आई-वडिलांचे छत्र हरवलेली अनेक मुले गुन्हेगारीकडे वळत असतात. मात्र अशा मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांकडून या मुलांना शिक्षण आणि प्रशिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम करण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये शहरात बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते. या मुलांचे समुपदेशन करून त्यांना शिक्षण आणि प्रशिक्षण दिल्यास योग्य रोजगार मिळू शकतो. शिवाय ही मुले गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर होतील, या हेतूने त्यांचे पुर्नएकात्मीकरण करण्याबाबत वर्षभरापूर्वी मुंबई पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली आहे.यासाठी पोलिसांनी सामाजिक कार्य करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली आहे. अशा प्रकारे वर्षभरात पोलिसांनी साडेचार हजार विधी संघर्षग्रस्त बालकांचे पुनर्एकात्मीकरण करण्याचे काम सुरू केले आहे.
गोवंडीतील शिवाजीनगरात ही अशाच प्रकारे समाजापासून दुरावलेली अनेक मुले आहेत. यातील २५ मुलांना प्रथम मुंबई शिक्षण उपक्रम या स्वयंसेवी संस्थेने व्यावसायिक प्रक्षिणक देत त्यांना चांगला मार्ग दाखविला आहे. तसेच या परिसरातील आणखी ३०७ विधीसंघर्षग्रस्त बालकांचे समुपदेशन करून त्यांच्यातही शैक्षणिक आवड निर्माण करून त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात सामाविष्ठ करण्याचे काम या संस्थेकडून सुरू आहे. येत्या काही दिवसांत शहरातील बालगुन्हेगारी पूर्णपणे नष्ट करण्याचा मानस असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)