मुंबई :
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेसाठी, मुख्यमंत्रिपदासाठी कधीही विचारांशी तडजोड केली नाही, आम्ही त्यांच्याकडूनच हे शिकलो, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला लगावला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचेे औचित्य साधून विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात त्यांच्या बसवण्यात आलेल्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.
अन्यायाविरोधात लढण्याची शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी दिली. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आम्ही काम करत आहोत. ते रिमोंट कंट्रोल होते, ते त्यांचा रिमोट सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी चालवायचे, स्वतःला काय हवे म्हणून ते रिमोट कंट्रोल चालवायचे नाहीत, त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत. बाळासाहेबांना सगळीकडे भगवा रंग पाहायचा होता, त्यांचे हेच विचार घेऊन आम्ही पुढे जात असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
या कार्यक्रमाला उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नेते आणि पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते छगन भुजबळ या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. हा राजकीय कार्यक्रम असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
तुफानापेक्षा प्रचंड संघर्ष करणारे नेतृत्व - देवेंद्र फडणवीसबाळासाहेब ठाकरे प्रसंगी अतिशय शांत आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा तुफानापेक्षा प्रचंड संघर्ष करणारे अथांग नेतृत्व होते, अशा शब्दात फडणवीस यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले.
बाळासाहेबांमुळेच आजचा क्षण - राहुल नार्वेकरमाझ्या जीवनात आजचा क्षण हा बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आला आहे, अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भावना व्यक्त केल्या.