BREAKING Eknath Shinde: शिंदे गटाला चिन्ह मिळालं! ठाकरेंच्या 'मशाल' विरोधात 'ढाल-तलवार' लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 05:46 PM2022-10-11T17:46:30+5:302022-10-11T17:48:05+5:30
ठाकरे गटाला मशालचं चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाला नेमकं कोणतं चिन्ह मिळणार याची उत्सुकता होती.
मुंबई-
ठाकरे गटाला मशालचं चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाला नेमकं कोणतं चिन्ह मिळणार याची उत्सुकता होती. अखेर निवडणूक आयोगानं आपला निर्णय जाहीर केला असून शिंदे गटाला म्हणजेच 'बाळासाहेबांची शिवसेना' या पक्षाला 'ढाल-तलवार' हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगानं या संदर्भातील घोषणा केली आहे.
शिंदे गटानं याआधी सुचवलेले तीन पर्याय निवडणूक आयोगानं फेटाळून लावले होते आणि तीन नवी चिन्हं सूचवण्याची संधी दिली होती. त्यानंतर शिंदे गटाकडून आज सकाळी निवडणूक आयोगाकडे तळपता सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचं झाड असे तीन पर्याय सूचविण्यात आल्याची माहिती समोर आली होती. अखेर निवडणूक आयोगानं ढाल-तलवार चिन्हाला हिरवा कंदील दाखवला आहे.
डीएमके पक्षाचं निवडणूक चिन्ह उगवता सूर्य आहे आणि तळपता सूर्य हे चिन्ह शिंदे गटाला दिलं गेलं तर मतदारांचा गोंधल होऊ शकतो. त्यामुळे तळपता सूर्य हे निवडणूक चिन्ह देता येणार नसल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. तसंच ढाल-तलवार या चिन्हाचीही माहिती आयोगानं दिली आहे. ढाल-तलवार हे चिन्ह याआधी पीपल्स डेमोक्रॅटिक मोमेंट पक्षाला दिलं होतं. पण २००४ साली या पक्षाची नोंदणी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे हे चिन्ह उपलब्ध आहे आणि हे चिन्ह 'बाळासाहेबांची शिवसेना' या गटाला देण्यात आलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"