Join us  

Video: "बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहतेय तुमची सेना";अभंगाचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 2:37 PM

शिवसेना संपली, उद्दधव ठाकरेंनी शिवसेना संपवली.. असे शब्दप्रयोग अनेकदा ऐकायला मिळतात

मुंबई - राजधानी मुंबई, मुंबईतील लोकल आणि मुंबईची शिवसेना हे नातं मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलंय. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. तर, मुंबईकरांनीही शिवसेनेकडे मुंबई महापालिकेची तब्बल 25 वर्षे सत्ता दिली. राज्यात काही दिवसांपूर्वी मोठा राजकीय भूकंप झाला आणि शिवसेनेत दोन गट पडले. उद्धव ठाकरेंनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिवसेना विरुद्ध शिंदेसेना असा संघर्ष समोर येत आहे. निष्ठावंत शिवसैनिक आपलं ठाकरे प्रेम दाखवून देत आहेत. आता, मुंबईच्या लोकल ट्रेनमधील एका व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 

शिवसेना संपली, उद्दधव ठाकरेंनी शिवसेना संपवली.. असे शब्दप्रयोग अनेकदा ऐकायला मिळतात. मात्र, शिवसैनिक हा हाडाचा असतो, तो गावाखेड्यात आजही जिवंत आहे. त्यामुळे, जोपर्यंत शिवसैनिक आहे, तो पर्यंत शिवसेना संपणार नाही, असे शिवसेना नेते सांगतात. आता, याच निस्वार्थी शिवसैनिकांचा एक व्हिडिओ समोर आला. मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात, मुंबईच्या लोकल रेल्वेतून दैनंदिन प्रवास करणारे चाकरमानी टाळ वाजून अभंग म्हणताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या चाकरमान्यांच्या अभंगाच्या ओळी शिवसैनिकाला आणि शिवसेना नेत्यांना भावनिक करणाऱ्या आहेत.  हाती टाळ आणि मुखी बाळासाहेबांचे नाव घेऊन या चाकरमान्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अभंग गाऊन भाष्य केलं आहे. ''बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहतेय तुमची सेना'', अशा आशयाचे ही अभंगवाणी आहे. त्यामध्ये, सर्वसामान्य शिवसैनिक सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. विश्वनाथ महाडेश्वर यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबतच, कशी संपेल शिवसेना... ज्यांना संपवायची आहे, त्यांनी पुढील जन्मात येऊन प्रयत्न करावा, असे कॅप्शनही महाडेश्वर यांनी दिलं आहे. 

दरम्यान, राज्यात सध्या शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात आपले लोकप्रतिनी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते गोळ्या करण्याची स्पर्धाच लागली आहे. त्यातूनच, मातोश्रीवर भेट देणाऱ्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची सध्या गर्दी दिसून येते. तर, शिंदेगटाकडूनही शिवसेनेती नेते, कार्यकर्ते आपल्या गटात सहभागी झाल्याचे दाखवण्यात येत आहे.  

टॅग्स :शिवसेनामुंबईसोशल व्हायरल