बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी महापालिका जिंकणारच; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 06:44 AM2022-08-21T06:44:45+5:302022-08-21T06:45:17+5:30
"मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार, महाराष्ट्राचे आता तुकडे पाडणार असे दरवेळचे डायलॉग आता महापालिका निवडणूक जवळ येईल तसे सुरू होतील, अहो! जरा डायलॉग तरी बदला"
मुंबई :
मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार, महाराष्ट्राचे आता तुकडे पाडणार असे दरवेळचे डायलॉग आता महापालिका निवडणूक जवळ येईल तसे सुरू होतील, अहो! जरा डायलॉग तरी बदला, असे शाब्दिक टोले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेसोबत मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणारच असेही फडणवीस म्हणाले.
षण्मुखानंद सभागृहात आयाेजित कार्यक्रमात बाेलताना फडणवीस पुढे म्हणाले की, निवडणूक जवळ आल्यावर भावनिक मुद्दे सुरू होतील. दरवेळी हेच डायलॉग असतात, आता किमान डायलॉग तरी बदला. बाळासाहेबांच्या नावाने मते मागून यापूर्वी ज्यांनी मते मागितली ते आत्मकेंद्री होते, त्यांनी स्वत:पलिकडे बघितले नाही, मुंबईकरांना वाऱ्यावर सोडले असे फडणवीस म्हणाले.
मुंबई दिल्लीसमोर झुकल्याचे आता ते बोलत आहेत. मुंबई आर्थिक राजधानी आहे. दिल्ली देशाची राजधानी आहे. मुख्यमंत्री दिल्लीत गेले तर दिल्लीश्वरांसमोर झुकले, अरे एवढे दिवस काँग्रेसचे मुख्यमंत्री, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. तेही दिल्लीत जायचे. जावेच लागते दिल्लीत. तुम्ही तर सोनिया गांधींसमोर झुकायला गेले होते, आम्ही महाराष्ट्राचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी लागेल तितके वेळा देवू, असे उत्तरही फडणवीस यांनी दिले.आशिष शेलार क्रिकेटशी संबंधित आहेत त्यांना आता राजकारणात ट्वेंटी, ट्वेंटी खेळायची आहे. एमसीएमध्ये शेलारांनी मुंबई प्रीमीयर लिग सुरू केली आहे. आता पालिकेत मुंबई महापालिका विकास लीग तयार करायची आहे, असेही फडणवीस म्हणाले.
आशिष शेलार यांची टाेलेबाजी
आपण घरात बंद खोलीत बसून राहिलो की, बाहेरचे विशाल जग संपल्यासारखे वाटायला लागतेच, असा टोला लगावत ॲड. आशिष शेलार यांनी सेनेला प्रत्युत्तर दिले. उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावर सेनेतर्फे काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकावर भाष्य करताना शेलार बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पर्व संपत आले म्हणून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव भाजप वापरते असे जे मा. सुपुत्रांना वाटतेय...हे म्हणजे अती झाले आणि हसू आले...! पण काय करणार?
आपण घरात बंद खोलीत बसून राहिलो की, बाहेरचे विशाल जग संपल्यासारखे वाटायला लागतेच, असे शेलार पुढे म्हणाले.