मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बोरिवली पश्चिम दुर्तगती महामार्गा जवळ असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि समाजासाठी, समाजाच्या कार्यालयासाठी मुंबई महापालिकेकडून जागा मिळवून दिली. परंतू कोनशीलेवर त्यांच्या बद्दल कृतज्ञतेचा साधा उल्लेखही नाही ? अशा संतप्त शब्दांत शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांनी संबंधितांना कानपिचक्या दिल्या.
बोरीवली पूर्व येथील वैश्य समाज सभागृहात ज्येष्ठ नागरिक संघाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. बोरिवली येथील टाटा स्टील कंपनी आज नाही पण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा दिमाखात उभा आहे पण हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ज्या कार्यशाळेत तयार झाला त्या ठिकाणी जाऊन स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या हाताने या पुतळ्याला आकार दिला, अशी आठवण ही नेरुरकर यांनी सांगितली.
आपण सारे आरंभशूर आहोत. अनेक संस्था स्थापन होतात आणि मग त्या इतिहास जमा होतात. पण ज्येष्ठ नागरिक संघ तब्बल पंचवीस वर्षे पूर्ण करुन आज २६ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे ही अतीशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. वयाची सत्तरी ओलांडलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे. हा उत्साह पाहून आमच्या सारख्या कार्यकरत्यांना हुरुप येतो. तात्या पिंपळे यांच्या सारखे पाच सहा जण चक्क नव्वदी ओलांडलेले असून तेही ठणठणीत आहेत. सहस्त्रचंद्र दर्शनाचा सोहोळा झाला. ही सुखावणारी गोष्ट आहे, अशा शब्दांत विश्वनाथ नेरुरकर यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचा गौरव केला.
ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा रुचिरा दिघे यांनी नेरुरकर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. संगीता सोमण, सुषमा नेरूरकर, वैशाली बापट, नीला सातार्डेकर, सुहासिनी नार्वेकर, सुरेश केळकर, सुरेश जोगळेकर, सुधाकर गांधी, श्रीधर परब, पांडुरंग वायंगणकर हे दहा ज्येष्ठ नागरिक सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याचे मानकरी होते. त्यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन विश्वनाथ नेरुरकर यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी अशोक परब आणि निलेश माळी यांच्या अधिपत्याखालील स्वर हार्मनी वाद्यवृंदाचा बहारदार गीतांचा कार्यक्रम झाला. मीना इंगळे यांनी वाद्यवृंदाच्या कार्यक्रमाचे संचालन केले. ज्येष्ठ नागरिक संघाच्या स्मीता चितळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. बाळ राणे, संदेश नारकर यांच्या सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.