मुंबई-
मशिदीवरील भोंग्यांवरुन सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भोंग्यांसाठी केंद्रानं राष्ट्रीय धोरण आणावं अशी गुगली टाकत मोदी सरकारवर पलटवार केला आहे. तसंच भोंग्यांबाबत आम्हाला कुणी अक्कल शिकवू नये असं म्हणत राऊतांनी राज ठाकरेंचं नाव न घेता टोला लगावला. यावेळी संजय राऊतांनी मुस्लिम धर्मियांच्या रस्त्यावरील नमाज पठणाचा विषय दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चर्चेतून कसा सोडवला होता याची आठवण करुन दिली.
"बाळासाहेबांनी मुस्लिम धर्मियांचा रस्त्यावरील नमाज पठणाचा विषय चर्चेतून सोडवला होता. चर्चेतून प्रश्न सोडवले जातात. त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन यात लक्ष घातलं होतं. ते केवळ भूमिका घेऊन थांबले नाहीत. तर तोडगाही काढला", असं संजय राऊत म्हणाले. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत बाळासाहेबांनी रस्त्यावरील नमाजाचा विषय कसा निकाली काढला याची माहिती राऊतांनी यावेळी दिली.
काय म्हणाले राऊत?"शिवसेना प्रमुखांना सातत्यानं अनेक प्रश्न मुस्लिमांबाबत चर्चेतून सोडवले. त्यांनी निश्चितच एक आक्रमक भूमिका घेतली. रस्त्यावरचे नमाज ही त्या काळातली एक समस्या होती. बाळासाहेबांनी तेव्हा आव्हान दिलं होतं रस्त्यावरचे नमाज बंद करा. भोंगे उतरवा. पण ही भूमिका घेऊन ते थांबले नाहीत. महाराष्ट्रात जेव्हा युतीचं सरकार आलं. तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी सर्व प्रमुख मुस्लिम मौलवींशी चर्चा केली होती. तेव्हा रस्त्यावरचे नमाज बंद करण्यासाठी काय केलं पाहिजे, याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. मौलवींनी तेव्हा आमच्या मशिदी लहान आहेत. त्यामुळे आम्हाला नमाज पडायला जागा नाही. यासाठी आम्हाला एफएसआय वाढवून द्यावा जेणेकरुन मशिदीची उंची वाढवता येईल. तेव्हा बाळासाहेबांनी ही बाब मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली. एफएसआय वाढवून देण्यात आला. त्यानंतर मुंबईत रस्त्यावरचे नमाज बंद झाले हा इतिहास सर्वांना माहित आहे. तोडगा काढण्याची हिंमत त्यावेळी शिवसेनेनं दाखवली होती. आता भोंग्यांबाबत केंद्र सरकारनं हिंमत दाखवून राष्ट्रीय धोरण आणावं आणि त्याची सुरुवात बिहार, गुजरात, दिल्लीपासून करावी. महाराष्ट्र देखील याचं पालन करेल", असं संजय राऊत म्हणाले.
राष्ट्रीय धोरण आणण्याचं केलं आवाहन"भोंग्यांच्या नावाखाली काही लोक राजकीय ढोंग करत आहेत. यामुळे हिंदुत्व बदनाम होत आहे. पंतप्रधान मोदींना आमचं आवाहन आहे की त्यांनी देशभरासाठी एक धोरण निश्चित करावं. मग ते भोंगे कोणतेही असोत. मशिदीवरचे भोंगे असोत मंदिरावरचे असो किंवा मग तुम्ही निर्माण केलेले राजकीय भोंगे असोत. सर्वांसाठी नियम निश्चित करा आणि याची सुरुवात आधी बिहारमधून करा. महाराष्ट्र कायद्याचं पालन करणारं राज्य आहे. आम्ही नक्कीच धोरणाचं पालन करू", असं संजय राऊत म्हणाले.