Join us

'बाळासाहेब वाघासारखे जगले, उद्धव ठाकरे शेळीसारखे वागताहेत', प्रवीण दरेकरांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 11:07 PM

Mumbai News: उद्धव ठाकरे यांनी आपले सर्व विचार काँग्रेसच्या दावणीला बांधले आहेत. बाळासाहेब ठाकरे हे वाघासारखे जगले. मात्र उद्धव ठाकरे हे शेळीसारखे वागत आहेत अशी घणाघाती टीका दरेकर यांनी केली आहे.

मुंबई-  उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यातून केलेल्या टीकेला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी आपले सर्व विचार काँग्रेसच्या दावणीला बांधले आहेत. बाळासाहेब ठाकरे हे वाघासारखे जगले. मात्र उद्धव ठाकरे हे शेळीसारखे वागत आहेत अशी घणाघाती टीका दरेकर यांनी केली आहे.

दरेकर म्हणाले की, नेहमी प्रमाणे उद्धव ठाकरेंच्या भाषणात आगपाखड दिसली, पोटशूळ दिसला. कपटी, औलाद, गद्दार, कमळाबाई या कोट्याच्या पलीकडे त्यांचे भाषण गेले नाही. उद्धव ठाकरे संघाला आपण कुठले आंदोलन केले विचारता. समितीत होते पण चळवळीत नव्हते. मी शिवसेनेतून आलोय. उद्धव ठाकरेंनी रस्त्यावर उतरून एकही आंदोलन केलेले मला माहित नाही. त्यांच्यावर आंदोलनाच्या झालेल्या केसेसतला मार मला माहित नाही. त्यांनी आंदोलनाच्या गोष्टी करू नयेत. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या शिवसैनिकांनी किंबहुना जी ४० लोकं गेली आहेत त्यांनी आंदोलने केली. शिवसेना उभी राहिली. तुम्ही आयत्या बिळावर नागोबा झालेला आहात. आयत्या पीठावर रेघोट्या मारण्याचे काम तुम्ही करताहेत, अशी टिकाही दरेकर यांनी केली.

दरेकर पुढे म्हणाले की, वाघनखांच्या बाबतीत बोलताहात. मुनगंटीवार यांच्यावर टीका करताहात. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. बाळासाहेब वाघासारखे जगले. तुम्ही शेळ्यासारखे वागलाय. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारची वक्तव्य करण्याचा अधिकार उरत नाही. बाळासाहेबांचा सच्चा वाघ आज राज्याचा मुख्यमंत्री आहे. आपण चिंता करू नका. तिकडे गेले की इमान विकले. ज्यांनी आयुष्यभर आपला संघर्ष करून संघटना उभी केली. तुम्ही पक्षासाठी काय केलात असा प्रश्नही दरेकरांनी विचारला.

ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे तुम्ही भाजपच्या सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांची चिंता करू नका. भाजपा कार्यकर्त्याला जेवढे महत्व देतो, निष्ठावंताना जेवढे महत्व देतो इतका कुठलाही पक्ष देत नाही. उद्धव ठाकरे तुमच्याकडे झेंडा लावायला माणसं नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पूर्णपणे भगवेमय वातावरण केले आहे. सतरंजी लावायला तुमच्याकडे माणसं नाहीत. कारण तुमच्या कार्यकर्त्यांचा पक्ष असलेला बेस ढासळला आहे. जो सर्व शिंदे यांच्याकडे गेलाय. जरांगे, धनगर समाज यावर बोलून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. परंतु तुम्ही कसे राजकारण केलात ते महाराष्ट्राने पाहिले आहे.

दरेकर पुढे म्हणाले की, रावणाचेही उदात्तीकरण करण्यासाठी रावण शिवभक्त होता अशा प्रकारचे वक्तव्य करून त्याचे कळत नकळत समर्थन उद्धव ठाकरे यांच्याकडून केले गेले. बाळासाहेब भक्त एकनाथ शिंदे होते. आपल्याकडेही बाळासाहेबांच्या विचाराला मूठमाती देणारी रावणी प्रवृत्ती माजली होती. म्हणून अशा प्रकारचे टोकाचे पाऊल बाळासाहेबांच्या विचारांसाठी त्यांच्या भक्ताने, एकनाथ शिंदे यांनी उचलले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या भाषणात कुठल्याही प्रकारचा विचार नव्हता. विचार असेल कसा? त्यांनी सर्व विचार काँग्रेसच्या दावणीला बांधलेत. त्यांचे इमान विरोधी प्रवृत्तीशी विकले गेले आहेत. त्यांनी इमानीची भाषा आपल्या भाषणातून करणे हास्यास्पद असल्याचेही दरेकरांनी म्हटले.

उद्धवजी तुमच्या पंक्तीला कोणकोण बसलेत ते पाहादरेकर म्हणाले की, भाजपावर टीका करताना उद्धव ठाकरे पंक्तीला बसणार, भांडणे लावणार आणि दुसरीकडे जेवायला जाणार म्हणतात. परंतु उद्धव ठाकरे यांनी आपल्या पंक्तीला कोणकोण बसवले आहेत ते पाहावे. मूळ लोकं एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेली. पक्ष गेला. तुम्ही काँग्रेसला बाजूला बसवलेय, समाजवादी, पवारांच्या राष्ट्रवादीला बाजूला बसवलेय. आता एमआयएम बाकी आहे. एकनाथ शिंदे म्हणालेत आणखी कुठल्या दहशतवादी संघटना आणून बसवाल. त्यामुळे आपल्या पंक्तीचे डेकोरम काय आहे ते बघा मग बोलण्याचे धाडस करा.

टॅग्स :उद्धव ठाकरेबाळासाहेब ठाकरेप्रवीण दरेकर