बाळासाहेबांचे आदेश, राज्यपालांचे पत्र अन् मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 05:38 AM2024-02-24T05:38:33+5:302024-02-24T05:39:03+5:30
मनोहर जोशी यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान बाबाजी शिंदे यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. ते म्हणाले, शिवसेनेतला सगळ्यात महत्त्वाचा राजकीय क्षण म्हणजे मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना घडलेला प्रसंग. या क्षणाचा मी साक्षीदार आहे.
मुंबई : ‘१९९५ साली मनोहर जोशी यांच्या रुपाने शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री राज्याला मिळाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी राज्यपालांकडून लागणारे पत्र मनोहर जोशी यांना देण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली होती. राज्यपालांच्या बंगल्यापासून दादर कोहिनूर येथील हॉटेलपर्यंत हे पत्र आणल्यानंतर झालेला जल्लोष...’ हा प्रसंग कायम स्मरणात राहिल्याचे जोशी यांचे विश्वासू सहकारी बाबाजी शिंदे यांनी सांगितले.
मनोहर जोशी यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान बाबाजी शिंदे यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. ते म्हणाले, शिवसेनेतला सगळ्यात महत्त्वाचा राजकीय क्षण म्हणजे मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना घडलेला प्रसंग. या क्षणाचा मी साक्षीदार आहे.
बिनधास्त सर
पुण्यातील काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानच्या एका कार्यक्रमाला बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांनी जोशी सरांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. नेमके त्याच सुमाराला जोशी सरांविरुद्धच्या खटल्यांचा निकाल येणार होता. जोशी सरांनी बॅ. गाडगीळ यांना फोन केला व स्पष्टपणे विचारले, की निकाल विरुद्ध लागणार अशा समजुतीमुळे लोक सध्या माझे कार्यक्रम पुढे ढकलत आहेत, तर तुम्ही तुमचा कार्यक्रम पुढे ढकलल्यास माझी हरकत नाही. तेव्हा बॅ. गाडगीळ यांनीही स्पष्ट उत्तर दिले, की निकाल काहीही लागो, माझ्या आमंत्रणात बदल होणार नाही. योगायोगाने त्या कार्यक्रमाच्या काही दिवस अगोदर जोशी सरांच्या बाजूने निकाल लागला. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जोशी सरांनी बॅ. गाडगीळांना हसत विचारले की, विठ्ठलराव तुम्हाला निकाल माहीत झाला होता का? तेेव्हा बॅ. गाडगीळ यांनी मिश्कीलपणे उत्तर दिले- “नाही! पण, मी बॅरिस्टर आहे.”
पोलिसांना पगारवाढ देणारे मुख्यमंत्री
पोलिसांची पगारवाढ करणारे पहिले मुख्यमंत्री म्हणजे मनोहर जोशी. त्यांनी पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलेले आश्वासन मुख्यमंत्रिपदी आल्यावर लगेच पूर्ण केले. ते आमच्या कायम आठवणीत राहतील, असे सांगत मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी तैनात पोलिसांनी भावनांना वाट मोकळी करून दिली.
शिवसेना उभी राहताना मनोहर जोशींसोबत नेटाने उभे राहिलेल्या शिवसैनिकांचे डोळे तर आठवणी सांगताना भरून येत होते. जोशी सरांसारख्या जिवाला जीव देणाऱ्या शिवसैनिकांमुळे शिवसेना अनेक संकटांवर मात करून वेळोवेळी उभी राहिल्याचे शिवसैनिकांनी आवर्जून सांगितले. फक्त राजकीय नाही, तर सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांतील त्यांची कामगिरी, योगदान आमूलाग्र बदल घडविणारे होते. शिक्षण क्षेत्राविषयी त्यांना तळमळ होती. शिवसैनिक त्यांच्या पाठीशी होते आणि वेळ पडली तर ते शिवसैनिकांच्या मागे खंबीरपणे उभे राहत, अशा आठवणी महिला कार्यकर्त्यांनी सांगितल्या.
शिक्षणातील ‘सर’ ते लोकसभा अध्यक्ष म्हणून ‘स्पीकर सर’ अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे. आपल्यासाठी वैयक्तिक पातळीवर ही मोठी हानी आहे. विकासाची चौफेर दृष्टी असलेल्या एका सुसंस्कृत, व्यासंगी नेत्याला महाराष्ट्र मुकला आहे.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. नगरसेवक ते महापौर, आमदार ते मुख्यमंत्री आणि खासदार ते लोकसभाध्यक्ष असे सर्व टप्पे त्यांनी आपल्या राजकीय जीवनात पूर्ण केले. शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.
मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान, सहकारी अशी जोशी सरांची ओळख होती.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री
स्पष्टोक्ती आणि धडाडीने काम करण्याची वृत्ती या व्यक्तिगुणांनी राजकीय वर्तुळात डॉ. जोशी यांची ओळख होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन राज्याच्या विकासासाठी परिश्रम घेतले. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार
मनोहर जोशी हे मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री तर होतेच, पण त्याहीपेक्षा ते एक सच्चा शिवसैनिक होते. संकटाच्या काळात ते शिवसेनाप्रमुखांसोबत, शिवसेनेसोबत राहिले. जिवाला जीव देणारे शिवसैनिक निघून गेला.
- उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना, (ठाकरे गट)
शिवसेनेच्या स्थापनेपासून मनोहर जोशी हे पहिल्या फळीतील नेते. शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरू राहिली. शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवण्याचे बाळासाहेबांचं स्वप्न त्यांच्या रूपाने पूर्ण झाले.
- राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
सरांची उणीव सदैव भासणार आहे. जोशी सरांचे व्यक्तिमत्त्व सर्वांसाठी प्रेरणादायी होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहणारे आहे. लोकशाहीचा पुरस्कार करणारे, विकासाचा ध्यास असणारे ते नेते होते.
- विजय वड्डेटीवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा