‘बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना पुन्हा सुरू करणार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:00 AM2017-08-05T03:00:09+5:302017-08-05T03:00:09+5:30
रस्ते अपघातातील जखमींवर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अपघातग्रस्त व्यक्तीला तातडीने उपचार मिळतील.
मुंबई : रस्ते अपघातातील जखमींवर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अपघातग्रस्त व्यक्तीला तातडीने उपचार मिळतील. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत, राज्यातील सर्वच नागरिकांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.
बुधवारी मरिन लाइन्स जिमखाना येथे आयोजित ‘मोटार बाइक अॅम्बुलन्स’ प्रकल्पाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठीच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून, खासगी रुग्णालयातील रुग्णांना सेवा देण्याची सोय राज्यभरात उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, तसेच आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर, महात्मा फुले जनआरोग्य योजना राज्यात पूर्णपणे लागू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, ही योजना देशातील क्रांतिकारक योजना ठरेल, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.
बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेची माहिती देताना डॉ. सावंत यांनी सांगितले की, अपघातग्रस्त व्यक्तीला ताबडतोब उपचार मिळाल्यास त्याचा जीव वाचू
शकतो, तसेच त्याच्या अपघातावरचा खर्च दिल्यास, त्याला दिलासा मिळू शकतो.
आरोग्य विभागाच्या माध्यमातून अपघातग्रस्त व्यक्तींना विम्याचा लाभ देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत अपघातग्रस्त व्यक्तीला पुढील तीन महिने ३0 हजार रुपयापर्यंत उपचार खर्च शासनाकडून मोफत करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील कुठल्याही नागरिकाला राज्यात अपघात झाल्यास, त्याला
मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.