Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray: महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा असा सामना रंगला आहेत. शनिवारी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. या टीकेला आज देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक शब्दात उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या वजनावरून हिणवण्याचा प्रयत्न काही राजकीय व्यक्तींकडून झाला. या टीकेला उत्तर देताना फडणवीसांनी उद्धव ठाकरेंनाबाळासाहेब ठाकरेंच्या काही विधानांची आठवण करून दिली.
"माझ्याबद्दल बोलताना कुणीतरी म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी नुसता पाय जरी ठेवला असता तरी बाबरीचा ढाचा कोसळला असता. माझ्या वजनावरून बोलणाऱ्या लोकांना मी कधीच घाबरत नाही. पण उद्धव ठाकरेंना एक आठवण करून देतो की माननीय बाळासाहेब ठाकरे शरद पवार यांना मैद्याचं पोतं म्हणायचे. त्याच मैद्याच्या पोत्याच्या पायावर नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री झालात. वजनदार लोगों से संभल के रहना. जेवढं वजन वर दिसतंय, त्याच्या दुप्पट वजन जमिनीखाली मुळांमध्ये रोवलेलं आहे", अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला लगावला.
"बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझं वजन १२८ किलो होतो. आता माझं वजन १०२ किलो आहे. आता, हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरे म्हणतात की बाळासाहेब भोळे होते, मी धूर्त आहे. ते बरोबरच म्हणाले. कारण वाघ हा भोळाच असतो, पण धूर्त कोण असतो ते सगळ्यांनाच माहिती आहे. बाळासाहेब हे खरोखरच वाघ होते यात वाद नाही. पण आता बाळासाहेबांनंतर या देशात फक्त एकच वाघ आहेत आणि त्या वाघाचं नाव नरेंद्र मोदी", अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांची अप्रत्यक्षपणे तुलना करत उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.