मुंबई - शिवसेना उबाठा आणि भाजपामधील वाद विकोपाला जात असल्याचे दिसून येते. दोन्ही पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर टीका करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ही टीका करताना अनेकदा वरिष्ठ नेत्यांकडूनही मर्यादा ओलांडल्या जात आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना यापूर्वी कलंक हा शब्द वापरला होता. त्यानंतर, आता नाव न घेता टरबुज्या म्हणत खिल्ली उडवली. त्यावरुन, भाजपा नेतेही आक्रमक झाले आहेत. यावर, उपसभापती निलम गोऱ्हे यांनीही भूमिका मांडली आहे.
शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जळगावात सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं. “टरबुज्यासारखा माणूस मी पाहिलेला नाही. पण, आता टरबुज्यासारखा गोल माणूस मी पाहतो”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली. त्यानंतर, भाजपाचे नेतेही आक्रमक झाले असून उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका करत आहेत. यासंदर्भात उद्धव ठाकरेंच्या माजी सहकारी आणि विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी मत व्यक्त केलं आहे.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वादावर विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी भूमिका मांडली आहे. यावेळी, उद्धव ठाकरेंना त्यांनी एकप्रकारे सल्लाच दिलाय. मला असं नेहमीच वाटतं की, त्या दोघांचं जे नातं आहे, ते लव्ह आणि हेटचं आहे. ते एकमेकांबद्दल प्रचंड द्वेषाने आणि त्वेषाने बोलतात. ते दोघेही खूप मोठे नेते आहेत, मतभेदाकडून मनभेदाकडे गेलंच आहे, पण ही चांगली गोष्ट नाही.
यासंदर्भात, खरं सांगायचं तर देवेंद्रजींकडून मी तेवढे अपशब्द ऐकले नाहीत. उद्धव ठाकरेंचा ठाकरी बाणा असल्यामुळे ते बोलत असतील. पण, बाळासाहेब रागवून बोलले तरी हसवून ते मिटवतही होते, उद्धव ठाकरेंनीही तसं करावं, असं मला वाटतं, असे निलम गोऱ्हेंनी म्हटलं.दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांच्यावर विदूषकासारखी वेळ आली आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या. यावेळी त्यांनी जोकरचे कपडे घातलेल्या एका व्यक्तीला पत्रकार परिषदेत आणलं होतं.