शपथविधी सोहळ्यात शिंदे गटाच्या एकाही मंत्र्याकडून बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख नाही...!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 07:54 AM2022-08-10T07:54:53+5:302022-08-10T07:55:25+5:30
आज शपथ घेतलेल्या बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडताना वारंवार बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा वापर केला होता.
मुंबई : एकनाथ शिंदे गटातील नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, शपथ घेताना एकाही मंत्र्याने बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला नाही. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा मात्र त्यांनी आवर्जून बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला होता.
आज शपथ घेतलेल्या बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडताना वारंवार बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा वापर केला होता. इतकेच काय तर बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही भाजपबरोबर जात आहोत, असं आपल्या बंडखोरीचं समर्थनही करताना दिसत होते. मात्र, शपथविधि सोहळ्यात त्यांना बाळासाहेबांचा विसर पडला.
अजूनही २३ मंत्रिपदेे रिक्त
मंत्रिमंडळ विस्तारात १८ मंत्र्यांना शपथ देण्यात आली. त्यामुळे मुुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह २० जणांचे मंत्रिमंडळ झाले आहे. मंत्रिमंडळात ४३ मंत्र्यांचा समावेश करता येऊ शकतो. त्यामुळे अजूनही २३ मंत्रिपदे शिल्लक आहेत. नाराज आमदारांना या २३ रिक्त मंत्रिपदाचे गाजर दाखवले जाऊ शकते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना दोन मंत्रिपदे रिक्त ठेवून त्यांनी शेवटपर्यंत इच्छुक आमदारांना झुलवत ठेवले होते.
राज्य मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे गटाकडून अथवा भाजपकडून एकाही महिलेला संधी देण्यात आलेली नाही. १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, यात एकाही महिलेला स्थान नसल्याने विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक असून राज्याच्या स्त्री शक्तीवर हा अन्याय आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. महिला ‘होम मेकर’ नसून त्या ‘नेशन बिल्डर’ असाव्यात असे पंतप्रधान सांगतात. मात्र, राज्याच्या मंत्रिमंडळात महिलांना प्रतिनिधित्व देण्यात आले नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
संजय राठोड यांना मंत्रिपद दिल्याने चित्रा वाघ संतप्त-
संजय राठोड यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ संतप्त झाल्या आहेत. तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या राठोड यांना पुन्हा मंत्रिपद देणे अत्यंत दुर्दैवी असल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी शपथविधीनंतर माध्यमांशी बोलताना दिली. संजय राठोडविरुद्धचा माझा लढा सुरूच राहील आणि त्या लढ्यात आपण विजयी होऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. चित्रा वाघ यांना संजय राठोडसारख्या लोकांविरोधात संघर्ष करायचा असेल तर त्यांनी आमच्यासोबत यावे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी दिली, तर पुणे पोलिसांनी राठोडांना क्लीन चिट दिली आहे. त्यामुळेच त्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे.
कुणाला काही आक्षेप असेल तर त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, अशी प्रतिक्रिया याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राठोड यांना मंत्री करणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय आहे. चित्रा वाघ यांनी वैयक्तिक मत व्यक्त केले आहे. त्या पहिल्यापासून संबंधित प्रकरणात लढा दिल्याचे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. शपथविधीनंतर, मी बोलतो ना, नक्कीच बोलेन असे सांगत राठोड निघून गेले. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी, ‘भाजप म्हणजे वॉशिंग मशीन झाला असून कोणालाही तिथे स्वच्छ करवून घेतले जाते’ अशी टीका केली.