मोठी बातमी! बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा, निहार ठाकरेंची राजकारणात 'एन्ट्री'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 05:52 PM2022-07-29T17:52:03+5:302022-07-29T17:53:11+5:30
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलाच गट खरी शिवसेना असल्याचं सिद्ध करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
मुंबई-
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलाच गट खरी शिवसेना असल्याचं सिद्ध करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांकडून निष्ठेची शपथपत्र घेत पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. आता तर थेट ठाकरे घराण्यातील सदस्यच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागला आहे.
दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा दिला आहे. तसंच शिंदे यांच्या नेतृत्वात निहार ठाकरे आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे.
कोण आहेत निहार ठाकरे?
निहार ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नातू आणि बिंदूमाधव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जयदेव ठाकरे हे निहार ठाकरे यांचे सख्खे काका तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चुलत काका आहेत. गेल्याच वर्षी निहार ठाकरे यांचा विवाह हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील हिच्यासोबत झाला आहे. अंकिता पाटील यांनी अलीकडेच राजकारणात प्रवेश केला असून बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला आहे. हर्षवर्धन पाटील हे भाजपत असले तरी त्यांच्या कन्या अद्याप काँग्रेसमध्येच आहेत. आता निहार ठाकरे यांनी थेट एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत राजकारणात एन्ट्री घेतली आहे.
शिवसेनेतील फुटीचा प्रश्न कोर्टात असल्यामुळे दोन्ही बाजूनं आता पक्षावरील वर्चस्व कुणाचं हे दाखवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच ज्येष्ठ शिवसैनिकांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. तसंच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ शिवसैनिक मनोहर जोशी यांचीही एकनाथ शिंदेंनी नुकतीच भेट घेतली होती.